आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजांनी सलग तिसऱ्या दिवशी पदकावर नाव कोरत हॅट्ट्रिक नोंदवली. राही सरनोबत, हीना सिद्धू आणि अनिसा सय्यद या त्रिकुटाने २५ मी. पिस्तूल प्रकारात कांस्यपदकावर कब्जा केला. या त्रिकुटाने १७२९ गुणांची कमाई केली. यजमान दक्षिण कोरियाच्या संघाने सुवर्ण, तर चीनने रौप्यपदकावर नाव कोरले.
अनिसाने ५७७, राहीने ५८० तर हिनाने ५७२ गुण पटकावले. राही आणि अनिसाने रॅपिड प्रकारात आक्रमक खेळ करत गुण पटकावले, तर हीनाने प्रिसिजन प्रकारात चमकदार कामगिरी केली.
१० मीटर एअर रायफल प्रकारात भारताची कामगिरी निराशाजनक झाली. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या अयोनिका पॉलने या प्रकारात अंतिम फेरीत आगेकूच केली, मात्र १२व्या प्रयत्नानंतर तिला डच्चू मिळाला. तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत तिच्या लक्ष्यभेदाचे विवरण १०.२, १०.२, १०.४, ९.९, १०.३, १०.४, ९.८. १०.५, ९.७, १०.५ असे होते. प्राथमिक फेरीत तिने ४१७.७ गुणांसह दुसरे स्थान मिळवले होते. मात्र हे गुण अंतिम फेरीसाठी ग्राह्य़ धरले जात नसल्याच्या नियमाचा अयोनिकाला फटका बसला.
या प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या अपूर्वी चंडेलाला ४१३.८ गुणांसह बाराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ४०७.६ गुणांसह राज चौधरीने ३५वे स्थान राखले.
सांघिक प्रकारात या त्रिकुटाने १२३९.१ गुणांसह सहावे स्थान मिळवले. सांघिक प्रकारात चीनने सुवर्ण, तर यजमान कोरियाने रौप्यपदक पटकावले.
‘‘राही आणि माझ्यावर गुण वाढवण्याची जबाबदारी होती. कारण हीना या प्रकारात नवीन आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत हे माझे पहिलेच पदक आहे. रॅपिड फायर प्रकाराचे विशेषज्ञ अशी आमची ओळख आहे. लौकिलाला जागत पदक पटकावल्याचा आनंद अनोखा आहे.’’
– अनिसा सय्यद