भारतीय पुरुष संघापाठोपाठ, मिताली राजच्या महिला संघानेही न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय महिलांनी न्यूझीलंडवर 8 गडी राखून मात केली. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला सध्या 2-0 ने आघाडीवर आहेत. न्यूझीलंडने दिलेलं 162 धावांचं आव्हान भारतीय महिलांनी स्मृती मंधाना आणि कर्णधार मिताली राजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. स्मृतीने सामन्यात नाबाद 90 तर मिताली राजने नाबाद 63 धावांची खेळी केली.
अवश्य वाचा – टी-20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, भारतीय संघासमोर तुलनेने सोपं आव्हान
सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या महिलांनी पहिल्या सामन्याच्या तुलनेत भारतीय महिलांचा नेटाने सामना केला. कर्णधार अॅमी सॅटरवेटने 87 चेंडून 71 धावांची खेळी करुन संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाढून दिली. मात्र न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारताकडून अनुभवी झुलन गोस्वामीन 3, एकता बिश्त-दिप्ती शर्मा आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी 2-2 तर शिखा पांडेने 1 बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारतीय महिलांची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्ज भोपळाही न फोडता माघारी परतली. यानंतर दिप्ती शर्माही अवघ्या 8 धावा काढून माघारी परतली. यानंतर मात्र स्मृती मंधानाने कर्णधार मिताली राजसोबत जोडी जमवत तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचली. या जोडीपुढे न्यूझीलंडच्या गोलंदाज अक्षरशः हतबल दिसल्या. स्मृती मंधानाला तिच्या अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.