जपानच्या हिरोशीमा शहरात पार पडलेल्या FIH Series Finals स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम फेरीत यजमान जपानवर ३-१ ने मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. आशियाई खेळांचं जेतेपद मिळवलेल्या जपानची कडवी झुंज मोडून काढत भारतीय महिलांनी ऑलिम्पिक पात्रता फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही भारतीय महिला संघाचं अभिनंदन केलं आहे.

कर्णधार राणी रामपालने तिसऱ्या मिनीटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. जपानकडून कानोन मोरीने ११ व्या मिनीटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर भारतीय महिलांनी जपानला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. गुरजित कौरने ४५ व्या आणि ६० व्या मिनीटाला गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे.

Story img Loader