भारतीय महिला संघाला चार देशांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत मंगळवारी सलामीच्या लढतीत न्यूझीलंडकडून १-४ असा पराभवाचा धक्का बसला.
एकतर्फी सामन्यात पिप्पा हेवर्डने दोन गोल करीत न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. अनिता मॅक्लेरीन व पेत्रीआ वेबस्टर यांनी प्रत्येकी एक गोल करीत तिला चांगली साथ दिली. भारताचा एकमेव गोल अनुराधादेवी थोकचोमने नोंदवला.
कडक उन्हात झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सुरुवातीपासून धारदार आक्रमणाचा पवित्रा घेतला होता. सहाव्या व ११व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र भारताची गोलरक्षक सविता कुमारीने नेत्रदीपक कामगिरी करीत हे गोल वाचवले. तथापि, १८व्या मिनिटाला हेवर्डला सूर गवसला. तिने सुरेख मैदानी गोल करीत संघाचे खाते उघडले. बरोबरी साधण्यासाठी भारतीय खेळाडूंनी प्रतिहल्ले केले, मात्र अचूकतेच्या अभावी त्यांना गोल नोंदवता आले नाहीत.
नवज्योत कौरने गोल करण्याची सुवर्णसंधी वाया घालवली. शेवटच्या डावात न्यूझीलंडने आणखी तीन गोल करीत आपली बाजू भक्कम केली. हेवर्डने ४७व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. पाठोपाठ मॅक्लेरिन (५१वे मिनिट) व वेबस्टर (५३वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाला सुस्थितीत नेले. भारताच्या अनुराधा देवीने गोल करीत सामन्यात रंगत वाढवली. मात्र न्यूझीलंडची आघाडी मोडून काढण्यात त्यांना यश मिळाले नाही.
आमच्या खेळाडूंना चेंडूवर नियंत्रण ठेवता आले नाही. खरे तर उत्तरार्धात आमच्यावर जरी तीन गोल झाले तरीही आमच्याकडे बराच वेळ चेंडूचा ताबा होता. तथापि आमच्या खेळाडूंनी योग्य समन्वयाअभावी अनेक संधी वाया घालवल्या. या सामन्यातील चुकांचा अभ्यास करीत पुन्हा त्या होणार नाहीत, याची काळजी आम्ही घेणार आहोत.
नील हॉवगुड, भारताचे मुख्य प्रशिक्षक