भारतीय महिला संघाला न्यूझीलंडमध्ये अखेरच्या टी-20 सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे भारतीय महिलांनी 3 टी-20 सामन्यांची मालिका 3-0 च्या फरकाने गमावली आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 162 धावांचं आव्हान भारतीय महिला पूर्ण करु शकल्या नाहीत. 20 षटकांमध्ये भारतीय संघ 4 विकेटच्या मोबदल्यात 159 धावांपर्यंतच मजल मारु शकला. अवघ्या दोन धावांनी सामन्यात बाजी मारत न्यूझीलंडच्या महिलांनी मालिकाही खिशात घातली आहे. स्मृती मंधानाने भारताकडून धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं, पण आपली जबाबदारी पूर्ण करणं तिला शक्य झालं नाही. अखेरच्या सामन्यात संधी मिळालेल्या मिताली राजला एका चेंडूत 4 धावा काढून संघाला विजय मिळवून देण्याचं आव्हान होतं, मात्र ती देखील यामध्ये अयशस्वी ठरली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडच्या महिला संघाने आपल्या डावाची सुरुवात केली. डिव्हाईन आणि बेट्स या जोडीने पहिल्या विकेटसाठी आपल्या संघाला 46 धावांची भागीदारी करुन दिली. अरुंधती रेड्डीने बेट्सला माघारी धाडत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर सोफी डिव्हाईनने इतर फलंदाजांना हाताशी धरत संघाचा डाव सावरला. डिव्हाईनने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतक झळकावलं. 52 चेंडूत 72 धावांची खेळी करताना डिव्हाईनने आपल्या संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन देण्यास मदत केली. मानसी जोशीने डिव्हाईनचा त्रिफळा उडवत संघाला महत्वाचा बळी मिळवून दिला. भारताकडून दिप्ती शर्माने 2 फलंदाजांना माघारी धाडलं, तिला अन्य गोलंदाजांनी चांगली साथ दिली.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरललेल्या भारतीय महिला संघाची सुरुवात तितकीशी चांगली झाली नाही. प्रियंका पुनिया अवघी एक धाव काढून माघारी परतली. दुसऱ्या बाजूने स्मृती मंधानाने आक्रमक खेळ करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या चिंतेत भर घातली. तिला दुसऱ्या बाजूने जेमायमा रॉड्रीग्जनेही चांगली साथ दिली. जेमायमा माघारी परतल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरही स्वस्तात तंबूत परतली. मधल्या काळात स्मृती मंधानाने मिताली राजसोबत छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. यादरम्यान स्मृतीने आक्रमक खेळ करत आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. मात्र 86 धावांवर मोठा फटका खेळण्याच्या नादात ती माघारी परतली. यानंतर अखेरच्या षटकात मिताली राज आणि दिप्ती शर्माने भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र एका चेंडूत 4 धावा काढण्याचं आव्हान भारतीय महिला फलंदाजांना जमलं नाही. अखेरीस न्यूझीलंडने 2 धावांनी सामन्यात विजय मिळवत मालिकेवर आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

Story img Loader