India W vs Australia W 1st Test: ‘म्हारी छोरी भी छोरो से कम नही है’ हे ‘दंगल’ या हिंदी चित्रपटातील वाक्य हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघाने आज सिद्ध करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकत इतिहास रचला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाने कांगारूंचा तब्बल आठ गडी राखून धुव्वा उडवला आहे. याआधी भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० कसोटी सामने खेळले आहेत, त्यातील ४ सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे तर ६ सामने अनिर्णित ठेवण्यात महिला ब्रिगेडला यश आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला गेला. रविवारी (२४ डिसेंबर) सामन्याच्या चौथ्या दिवशीच भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ५ बाद २३३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडे ४६ धावांची आघाडी होती. कांगारूंचा संघ चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात २६१ धावांवर सर्वबाद झाला. त्यांना एकूण ७४ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे भारताला विजयासाठी ७५ धावांचे लक्ष्य मिळाले. टीम इंडियाने हे लक्ष्य एक विकेट गमावत सहजरित्या पार केले.

स्मृती मानधनाने दुसऱ्या डावात भारताकडून सर्वाधिक नाबाद ३८ धावा केल्या. रिचा अंजनाने १३ धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज १२ धावांवर नाबाद राहिली. शफाली वर्माला केवळ ४ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून किम गर्थ आणि अ‍ॅशले गार्डनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताला पहिला विजय मिळाला आहे. दोन्ही संघांमध्ये १९७७ पासून आतापर्यंत ११ कसोटी सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत. सहा कसोटी अनिर्णित राहिल्या आणि आता भारताला एक विजय मिळाला.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव असा होता

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ताहिला मॅकग्रा ७३ धावा करून बाद झाला, अ‍ॅलिस पॅरी ४५ आणि बेथ मुनी ३३ धावा करून बाद झाल्या. अ‍ॅलिसा हिलीने ३२ आणि फोबी लिचफिल्डने १८ धावा केल्या. कांगारू संघाला खेळाच्या चौथ्या दिवशी पहिला धक्का अ‍ॅशले गार्डनरच्या रूपाने बसला. २७ चेंडूत ७ धावा करून ती बाद झाली. पूजा वस्त्राकरच्या चेंडूवर ती पायचीत झाली. तिच्यानंतर अ‍ॅनाबेल सदरलँड २७ धावा करून स्नेह राणाची शिकार झाली. त्यानंतर स्नेहने अ‍ॅलाना किंगला (०) क्लीन बोल्ड केले. राजेश्वरी गायकवाडने लॉरेन चीटलला (४ धावा) बाद करून ऑस्ट्रेलियाला नववा धक्का दिला. गायकवाडने अ‍ॅशले गार्डनरला (९ धावा) बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. भारताकडून स्नेह राणाने दुसऱ्या डावात चार विकेट्स घेतल्या. राजेश्वरी गायकवाड आणि हरमनप्रीत कौर यांना प्रत्येकी दोन विकेट्स घेण्यात यश मिळाले. पूजा वस्त्राकरने एक विकेट घेत संघाला मदत केली.

हेही वाचा: IND W vs AUS W: हरमनप्रीत कौर आणि अ‍ॅलिसा हिली यांच्यात शाब्दिक चकमक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

पहिल्या डावात दोन्ही संघांची कामगिरी

तत्पूर्वी, भारताने ४०६ धावा केल्या होत्या तर ऑस्ट्रेलिया केवळ पहिल्या डावात २१९ धावाच करू शकली. टीम इंडियाला पहिल्या डावात १८७ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. भारताकडून पहिल्या डावात दीप्ती शर्माने ७८ धावा केल्या. तिच्या खालोखाल स्मृती मंधानाने ७४ धावा, जेमिमाह रॉड्रिग्जने ७३ धावा आणि रिचा घोषने ५२ धावा करत टीम इंडियाला ४०० धावांचा टप्पा पार करण्यात मदत केली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात ताहिला मॅकग्राने सर्वाधिक ५० आणि बेथ मूनीने ४० धावा केल्या. भारताकडून पूजा वस्त्राकरने चार आणि स्नेह राणाने तीन विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian womens team has created history by winning a test match against australia for the first time by eight wickets avw