भारतीय महिला संघाने एप्रिल २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या महिला टी-२० विश्वचषक २०२३ साठी तयारी सुरू केली आहे. यासाठी संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. जिथे तो तिरंगी मालिका खेळत आहे. यामध्ये, सोमवारी भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध सामना खेळला. या सामन्यात भारताने ५६ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौरचे अर्धशतक –
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हरमनप्रीत कौर पहिला सामना खेळू शकली नव्हती. पण तिने वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार पुनरागमन केले. या सामन्यात संघाची सुरुवात संथ होती. १० षटके संपल्यानंतर भारताला केवळ ६० धावा करताना २ गडी गमावले होते.
यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांनी डाव सांभाळत हळूहळू वेग वाढवला. स्मृतीने ५१ चेंडूत ७१ धावा केल्या. तिने या शानदार खेळीत १० चौकार लगावले आणि एक शानदार षटकारही लगावला. त्याचवेळी हरमनप्रीत कौरनेही ३५ चेंडूत ५६ धावा केल्या. हरमनप्रीतने आपल्या डावात ८ चौकार लगावले. या दोघींनी मिळून भारताची धावसंख्या १६७ धावांवर नेली.
भारताने वेस्ट इंडिजचा ५६ धावांनी पराभव केला –
१६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज आणि शेमेन कॅम्पबेल यांनी मोठी भागीदारी केली. दोघींमध्ये ७१ धावांची भागीदारी झाली. मात्र भारताच्या तगड्या गोलंदाजीसमोर विंडीजच्या फलंदाजांना हात उघडता आले नाहीत. त्यामुळे वेस्ट इंडिजला २० षटकांत केवळ १११ धावा करता आल्या. दुसरीकडे भारताकडून दीप्ती शर्माने दोन विकेट घेतल्या.