ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणे ही अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया आदी देशांसाठी नित्याचीच बाब समजली जाते. मात्र भारतीय खेळाडूंसाठी ऑलिम्पिक पदक मिळवणे ही नेहमीच आव्हानात्मक गोष्ट ठरते. त्यामुळेच ऑलिम्पिकमधील कोणतेही पदक हे भारतीय खेळाडूंसाठी सोनेरी क्षणच असतो. आजपर्यंत नेमबाजीत फक्त चारच भारतीय खेळाडूंना ते स्वप्न साकारता आले आहे. हे सोनेरी क्षण पुन्हा अनुभवायची क्षमता आपल्याकडे आहे, हे अलीकडेच युवा खेळाडूंनी विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत दाखवून दिले आहे.
राजवर्धनसिंह राठोड यांनी २००४मध्ये अॅथेन्स येथे नेमबाजीत रौप्यपदक मिळवून दिले, तेव्हा या खेळाचे माहात्म्य भारतीयांना कळले. २००८मध्ये बीजिंग येथे अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवला. वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताला मिळालेले ते पहिलेच सुवर्णपदक होते. त्याच्या या सोनेरी यशामुळे आपल्या देशात खऱ्या अर्थाने नेमबाजीचे युग निर्माण केले. २०१२मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये विजय कुमारने रौप्य व गगन नारंगने कांस्यपदकाची कमाई करीत नेमबाजीच्या खेळाला आणखी प्रतिष्ठा मिळवून दिली. या साऱ्या खेळाडूंच्या कामगिरीमुळे नेमबाजीत केवळ संख्यात्मक नव्हे, तर दर्जात्मक प्रगती होऊ लागली आहे. शाळेपासूनच मुलामुलींना या खेळाची गोडी निर्माण झाली आहे.
विश्वचषक स्पर्धाची मालिका ही नवोदित खेळाडूंसाठी मोठा अनुभव घेण्यासाठी उत्तम संधी मानली जाते. मेक्सिकोमध्ये नुकतीच या मालिकेतील एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये परदेशातील अनेक अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा सहभाग होता. त्यांना मागे टाकून प्रथमच भारताने पदक तालिकेत प्रथम स्थान मिळवले व ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने या स्पर्धेत चार सुवर्ण, एक रौप्य व चार कांस्य अशी नऊ पदकांची कमाई केली. पिस्तूल व रायफल या दोन्ही प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी लक्षणीय यश मिळवले. रिओ येथे २०१६मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या नेमबाजांची पाटी कोरीच राहिली होती. या पाश्र्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी या विश्वचषक स्पर्धेत मिळवलेले यश प्रेरणादायकच आहे. २०२०मध्ये टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धाना यंदा सप्टेंबरपासून प्रारंभ होईल. त्याचप्रमाणे यंदा राष्ट्रकुल क्रीडा व आशियाई क्रीडा स्पर्धाही होणार आहेत. या स्पर्धापूर्वी भारतीय युवा नेमबाजांनी नऊ पदकांची कमाई करीत अपेक्षा उंचावल्या आहेत.
मनू भाकेर, ओमप्रकाश मिथ्रवाल, शहजार रिझवी, अखिल शेरॉन, अंजुम मुदगिल आदी खेळांडूचा त्यामध्ये मोठा वाटा आहे. या सर्वच खेळाडूंनी परदेशातील श्रेष्ठ खेळाडूंशी स्पर्धा करताना कोणतेही दडपण घेतले नाही. रिझवीने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सोनेरी मोहोर उमटवताना विश्वविक्रमही नोंदवला. आगामी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात त्याला स्थान मिळालेले नाही. त्याचे नैराश्य न दाखवता त्याने प्राथमिक फेरी व त्यापाठोपाठ अंतिम फेरीत सर्वोच्च कौशल्य दाखवले. रिझवीप्रमाणेच शेरॉनलाही राष्ट्रकुलसाठी निवडण्यात आलेले नाही, तरीही त्याने विश्वचषक स्पर्धेतील ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात सर्वोत्तम यश मिळवले. त्याची स्पर्धा सुरू असताना जोरदार वारे वाहत होते. त्याचा अडथळा खेळाडूंना होत होता. त्याच्या स्पर्धेच्या आदल्या दिवशी अंजुमला अशाच अडथळ्यांना सामोरे जावे लागले होते. अंजुमने दाखवलेले कौशल्य लक्षात ठेवीत शेरॉन यानेही यशस्वीपणे जोरदार वाऱ्याला तोंड देत सुवर्णपदक जिंकले. मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकले, पण त्याचबरोबर तिने ओमप्रकाशच्या साथीने मिश्र दुहेरीतही त्याच पदकाची पुनरावृत्ती केली. दुहेरीचा फारसा अनुभव नसताना त्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.
राठोड, बिंद्रा, विजयकुमार, नारंग आदी खेळाडूंनी ऑलिम्पिक पदकांना गवसणी घातली आहे. त्यांच्यासारखे यश मिळवण्याची क्षमता युवा खेळाडूंकडे आहे. अर्थात या युवा खेळाडूंसाठी आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यांना ऑलिम्पिक पदकासाठी अजून मोठा पल्ला गाठावयाचा आहे. अनेक वर्षे कठोर मेहनत केल्यानंतरच बिंद्राला सोनेरी यश मिळवता आले होते. युवा खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेतील यशावर समाधान न मानता आपल्याला ऑलिम्पिक पात्रता कशी पूर्ण करता येईल, याचा विचार केला पाहिजे. सुदैवाने आपल्याकडे जागतिक स्तरावरील सुविधा आहेत. प्रशिक्षकही अव्वल दर्जाचे आहेत. शासनाकडूनही भरघोस आर्थिक पाठबळ मिळत आहे. केंद्रीय क्रीडामंत्रीपदावर राठोड हे स्वत: असल्यामुळे ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याची जाणीव त्यांना आहे. आता खरी कसोटी युवा खेळाडूंचीच आहे. एम.सी.मेरी कोम, सायना नेहवाल, करनाम मल्लेश्वरी, साक्षी मलिक, पी.व्ही.सिंधू यांनी अनेक गोष्टींचा त्याग करीत ऑलिम्पिक पदक मिळवले आहे. त्यांचाही आदर्श युवा खेळाडूंनी घेण्याची आवश्यकता आहे. ऑलिम्पिक पदक हे केवळ वैयक्तिक खेळाडूसाठी नव्हे, तर देशासाठीही प्रतिष्ठेची कामगिरी असते, हे लक्षात घेऊनच त्यांनी पदकाचे स्वप्न साकारले पाहिजे.
मिलिंद ढमढेरे milind.dhamdhere@expressindia.com