भारताने २०१७ मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील गटाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या संयोजनपदासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यास जागतिक फुटबॉल महासंघाचे (फिफा) उपाध्यक्ष प्रिन्स अली बिन अल हुसेन यांनी पाठिंबा दर्शवताना भारतामधील फुटबॉलच्या विकासाबाबत कौतुकास्पद उद्गार व्यक्त केले.
भारतात ही स्पर्धा अतिशय भव्य स्वरूपात व नीटनेटकेपणाने आयोजित केली जाईल असा विश्वास व्यक्त करीत हुसेन म्हणाले, आशियाई देशांमधील भारत हा महत्त्वाचा देश आहे. या देशात फुटबॉलवर प्रेम करणारे असंख्य चाहते आहेत. या देशाने फुटबॉलमध्ये चांगली प्रगती केली आहे. विश्वचषक स्पर्धा येथे आयोजित केली गेली तर निश्चितपणे ग्रामीण स्तरावर या खेळाचा प्रसार होण्यास मदत होईल.
फिफाचे आठ उपाध्यक्ष आहेत. त्यापैकी वरिष्ठ दर्जाचे असलेले हुसेन यांनी सांगितले, भारतातील अनेक क्लबमध्ये आशियाई स्तरावर अव्वल दर्जाचे यश मिळविण्याची क्षमता आहे. त्यामुळे आशियाई आंतर क्लब स्पर्धेत भारताच्या संघांना थेट प्रवेश दिला पाहिजे.
आशियाई फुटबॉल विकास प्रकल्पांतर्गत मॅजिक बस या संस्थेने ग्रामीण विभागात फुटबॉलचा प्रसार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ हुसेन यांच्या हस्ते झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा