पी. व्ही. सिंधूपाठोपाठ सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारताचे एकेरी बॅडमिंटनमधील आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. याचप्रमाणे मिश्र व पुरुष दुहेरीतील पराभवामुळे भारताने बॅडमिंटनमधून गाशा गुंडाळला.
चीनच्या वांग यिहानने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सायना नेहवालचे आव्हान १८-२१, २१-९, २१-७ असे मोडून काढत शानदार विजय मिळवला.  
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मलेशियाच्या ली च्योंग वेई याने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपवर २१-१२, २१-११ अशी मात केली. दक्षिण कोरियाच्या वान्हो सन याने किदम्बी श्रीकांतला १९-२१, २१-११, २१-१८ असे नमवले.
मिश्र दुहेरी प्रकारात सिंगापूरच्या डॅनी बावा ख्रिसनन्ता आणि यु यान वनेसा जोडीने मनू अत्री-सिक्की रेड्डी जोडीवर २१-१८, २१-२३, २१-१५ असा विजय मिळवला; तथापि पुरुष दुहेरी प्रकारात इंडोनेशियाच्या मोहम्मद अहसान-हेंद्रा सेतिवान जोडीने मनू अत्री-सुमीत रेड्डी जोडीवर २१-१२, २१-१९ अशी मात केली.
शिवा, कुलदीप उपांत्यपूर्व फेरीत
बॉक्सिंग
बॉक्सिंगमध्ये पदकाची अपेक्षा असलेल्या शिवा थापा (५६ किलो) व कुलदीप सिंग (८१ किलो) यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणाऱ्या अखिल कुमार (६० किलो) याचे आव्हान संपुष्टात आले.
पहिल्या लढतीत पुढे चाल मिळालेल्या शिवा याने दुसऱ्या लढतीत पाकिस्तानच्या नादिर खानला केवळ सव्वा मिनिटांमध्ये गारद केले. त्याने मारलेला एक फटका नादिरच्या उजव्या डोळ्याच्या वरील बाजूला बसला. नादिरच्या जखमेतून रक्त वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे पंचांनी लढत थांबवली व शिवाला विजयी घोषित केले.
कुलदीपने थायलंडच्या थोंगक्राथोक अनावट याच्यावर २-१ अशी मात केली. कुलदीपने अप्रतिम कौशल्य दाखवत २-० अशी विजयी आघाडी घेतली. शेवटच्या तीन मिनिटांमध्ये कुलदीपने बचावात्मक पवित्रा घेतला. पंचांनी ही फेरी अनावटला बहाल केली. त्यामुळे कुलदीप याला २-१ या विजयावर समाधान मानावे लागले.  
अखिल कुमारला मात्र फिलिपिनो चार्ली सोरेझ याच्याकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला.
सनम, युकीची आगेकूच
टेनिस
सनम सिंग आणि युकी भांब्री यांनी उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. सनमने साकेत मायनेनीच्या साथीने खेळताना पुरुष दुहेरीतही उपांत्यपूर्व फेरी गाठली, तर सानिया मिर्झा- प्रार्थना ठोंबरे जोडीने महिला दुहेरीत दुसऱ्या फेरीचा अडथळा पार केला. सनमने च्युंगवर ७-५, ६-१ अशी मात केली. भांब्रीने ख्रिस्तोफर रुंगकटचा ६-३, ६-३ असा धुव्वा उडवला. दुहेरीत साकेत -सनम जोडीने सौदी अरेबियाच्या अम्मर अल्हाकबानी-ओमर फाहमी अहमद जोडीवर ६-०, ६-१ असा विजय मिळवला.
पुन्हा निराशा
अश्वारोहण
भारतीय अश्वारोहणपटूंना इव्हेंन्टिंग प्रकारात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. वैयक्तिक प्रकारातही पदकाच्या शर्यतीपासून ते दूरच राहिले. संग्राम सिंग, मृत्युंजय सिंग राठोड, मिर्झा फौआद, अजाय पुवय्या यांचा समावेश असलेल्या संघाला १८८.५० गुणांसह पाचवे स्थान मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा