Paras Mhambare said Ashwin is one of the country’s greatest matchwinners: भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा सहज पराभव केला. यजमान कॅरेबियन संघाने तिसऱ्या दिवशीच सामना गमावला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. त्याचवेळी रवी अश्विनने डॉमिनिका कसोटीत नेत्रदीपक गोलंदाजी केली. भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाने या सामन्यात १२ विकेट्स घेणाऱ्या रविचंद्रन आश्विनच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना कौतुक केले.
रविचंद्रन आश्विनने पहिल्या डावात वेस्ट इंडिजचे ५ खेळाडू बाद केले होते. त्याचबरोबर दुसऱ्या डावात ७ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे रवी अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात एकूण १२ विकेट घेतल्या आणि भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तसेच युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने १७१ धावांची मोठी खेळी साकारली.
सामना संपल्यानंतर भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पार म्हांबरे म्हणाले, ‘पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारणे आवश्यक होते, जे आम्ही केले, त्यामुळे गोलंदाजांना मदत झाली. अश्विन आणि जडेजाने शानदार गोलंदाजी केली.ड्रेसिंग रूममध्ये आम्ही गोलंदाजाच्या कामगिरीचे महत्त्व समजतो. माझ्या मते अश्विन हा देशाच्या महान मॅचविनर्सपैकी एक आहे. त्याने आमच्यासाठी अनेक सामने जिंकले आहेत आणि सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.”
हेही वाचा – IND vs WI: टीम इंडियाने डब्ल्यूटीसीमध्ये पटकावले अव्वलस्थान, ऑस्ट्रेलिया संघाला बसला फटका
१७१ धावा करणाऱ्या जयस्वालचे कौतुक म्हांबरे म्हणाले, “त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती चमकदार होती. फटके खेळणे सोपे नसलेल्या खडतर विकेटवर पहिल्याच कसोटीत शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय स्तरावर याचीच गरज आहे. वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेत संघाच्या आवश्यकतेनुसार कामगिरी करत आहे. हे पाहून आनंद झाला. या कामगिरीमुळे त्याचा आत्मविश्वास आणखी वाढेल.”
पारस म्हांबरे पुढे म्हणाले, “सुरुवात चांगली झाली आहे. मला इतक्या सहज विजयाची अपेक्षा नव्हती, पुढच्या सामन्यांमध्ये त्याचा फायदा होईल.” सध्याचा कॅरेबियन संघ भारताविरुद्ध कोणत्याच विभागात भारताला आव्हान देऊ शकला नाही, पण म्हांबरेंनी कॅरेबियन संघाला हलक्याच घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, “हे सगळे बाहेरचे आवाज आहेत. ड्रेसिंग रूममध्ये असे काही नाही. आम्ही येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहोत आणि त्याचे सर्वोच्च स्वरूप कसोटी क्रिकेट आहे. यापेक्षा मोठी प्रेरणा कोणती असू शकते.”