निवड समितीचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघाच्या प्रशिक्षकपदासाठी जाहिरात दिली होती. या जाहिरातीमध्ये दिलेल्या अटींची पूर्तता पाटील करताना दिसत आहेत.
‘‘मी आताच भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे,’’ असे पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी यापूर्वी केनिया आणि ओमान या देशांचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. पाटील यांनी १९९६ साली भारतीय संघाचेही प्रशिक्षकपद भूषवले होते, पण तेव्हा त्यांचा कार्यकाळ हा फक्त सहा महिन्यांचा होता. पण केनियाला त्यांनी घवघवीत यश मिळवून दिले होते. त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली केनियाने २००३च्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. २००५ या वर्षी बीसीसीआयमध्ये चार प्रशिक्षकांच्या नावांची चर्चा होती, त्यामध्ये पाटील यांचेही नाव होते, पण त्या वेळी पाटील यांनी ओमानचे प्रशिक्षकपद सांभाळणे पसंत केले होते. यापूर्वी पाटील यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपदही सांभाळले आहे. त्याचबरोबर सप्टेंबर २०१२पासून ते भारताच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा