दुखापतग्रस्त भारताने ऑस्ट्रेलियास चांगली लढत दिली मात्र हा सामना ३-० असा जिंकून ऑसी संघाने चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीतील अन्य लढतीत नेदरलँड्सने पाकिस्तानचा ५-२ असा पराभव केला.
कर्णधार सरदारासिंग याच्यासह भारताच्या तीन खेळाडूंच्या तंदुरुस्तीची समस्या भारतापुढे होती. त्यामुळे यजमान व बलाढय़ ऑसी संघाविरुद्ध भारताचा पराभव निश्चित होता. मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारताच्या नवोदित खेळाडूंनी कौतुकास्पद लढत दिली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार जिमी डायर (पाचवे व अठरावे मिनिट), किरॉन गोव्हर्स (४२ वे मिनिट) यांनी गोल केले. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत या स्पर्धेत सलग चार वेळा विजेतेपद मिळविले असून आता सलग पाचव्यांदा विजेतेपद मिळविण्याची त्यांना संधी आहे. भारताला रविवारी कांस्यपदकासाठी पाकिस्तानबरोबर खेळावे लागणार आहे. १९८२ मध्ये भारताने या स्पर्धेत पाकिस्तानवर मात करीत कांस्यपदक मिळविले होते. २००२ ते २००४ या कालावधीत पाकिस्तानने भारतावर विजय मिळवीत कांस्यपदकाची हॅट्ट्रिक केली होती.
भारताविरुद्धच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. दुसऱ्याच मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र त्याचा फायदा त्यांच्या ख्रिस्तोफर सिरिलो याला घेता आला नाही. पाचव्या मिनिटाला पुन्हा सिरिलो याने मारलेला फटका भारताच्या बचावरक्षकाने परतविला तथापि डायर याने शिताफीने चाल करीत त्यावर खणखणीत फटका मारला आणि संघाचे खाते उघडले. १८ व्या मिनिटाला डायर याची चाल रोखताना भारतीय खेळाडूंकडून पेनल्टीजवळ फाऊल झाले त्यामुळे ऑस्ट्रेलियास पेनल्टी स्ट्रोक मिळाला. त्याचा फायदा घेत डायर याने भारताचा गोलरक्षक टी.आर पोतुनुरी याला चकवित गोल केला.
मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियाने २-० अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात सातव्या मिनिटाला ऑस्ट्रेलियास गोल करण्याची संधी मिळाली. त्यांच्या आघाडी फळीतील खेळाडू किरॉन गोव्हर्सने ट्रेन्ट मिटॉनच्या पासवर गोल करीत संघास ३-० अशी आघाडी मिळवून दिली. हा गोल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने अनेक वेळा भारतीय गोलपर्यंत धडक मारली मात्र भारताच्या बचावरक्षकांनी या चाली हाणून पाडल्या.
भारतीय संघाला अधिकाधिक वेळ बचावात्मक खेळ करावा लागला. भारतास ४५ व्या मिनिटाला गोल करण्याची एकमेव संधी लाभली होती मात्र दानिश कनेरिया याला एस.व्ही.सुनील याने दिलेल्या पासवर अचूक फटका मारता आला नाही. सुनील, सरदारासिंग व मनप्रीतसिंग हे तीन खेळाडू स्नायूंची दुखापत असूनही या लढतीत खेळले त्यामुळेच भारताच्या चालींवर काहीसे दडपण आले होते. भारतास एकही पेनल्टी कॉर्नर मिळविता आला नाही.
संघाच्या कामगिरीबाबत नॉब्ज समाधानी
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारला असला, तरी संघाचे प्रशिक्षक मायकेल नॉब्ज यांनी खेळाडूंच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ऑलिम्पिकमधील लाजिरवाण्या कामगिरीच्या तुलनेत येथे आमच्या खेळाडूंनी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली हीच कौतुकास्पद गोष्ट आहे. ऑसीविरुद्ध आमचे तीन खंदे खेळाडू जखमी असूनही खेळले. त्यांनी दाखवून दिलेले धैर्य उल्लेखनीय आहे. रविवारी कांस्यपदक मिळविण्यासाठीच आम्ही खेळणार आहोत. पाकिस्तान जरी आमचा प्रतिस्पर्धी असला, तरी आमच्यावर कोणतेही दडपण नाही.
नेदरलँड्सची पाकिस्तानवर मात
आठ वेळा या स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या नेदरलँड्सने आक्रमक लढतीत पाकिस्तानवर ५-२ अशी मात केली. त्यांनी सहा वर्षांनंतर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी २००६ मध्ये त्यांनी या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.
बिली बाकर याने दुसऱ्याच मिनिटाला गोल करीत नेदरलँड्सचे खाते उघडले. सेवेरियानो व्हानअ‍ॅस याने २० व्या मिनिटाला त्यांचा दुसरा गोल केला. मात्र नेदरलँड्सकडून स्वयंगोल झाला. मध्यंतरापूर्वी पुन्हा बाकर याने आणखी एक गोल करीत संघास ३-१ असे अधिक्य़ मिळवून दिले. मध्यंतरानंतर  व्हॅलेन्टिना व्हेरगा (४६ वे मिनिट) व रॉबर्ट केम्परमेन (६१ वे मिनिट) यांनी गोल करीत डच संघाची बाजू बळकट केली. पाकिस्तानच्या शकील अब्बासी याने शेवटच्या मिनिटाला गोल केला.

Story img Loader