महिलांच्या १९ वर्षाखालील टी-२० विश्वचषकात भारताच्या लेकींची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. भारताच्या संघाने आतापर्यंत सर्व सामने जिंकत थेट उपांत्य फेरीत धडक मारली आहे. स्कॉटलंडविरूद्ध झालेल्या सुपर सिक्स फेरीतील सामन्यात भारताच्य गोंगाडी त्रिशा हिने शतक झळकावत मोठा विक्रम केला आहे. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी त्रिशाने महिलांच्या टी-२० विश्वचषकात नवा विश्वविक्रम केला आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर स्कॉटलंडच्या महिला संघाने भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. यानंतर गोंगडी त्रिशा आणि जी कमलिनी या सलामीच्या जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी अवघ्या १३ षटकांत धावफलकावर १३९ धावा जोडवल्या. यादरम्यान गोंगडी त्रिशाने वादळी फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण करण्यात यश आले.
१४व्या षटकात कमलिनी बाद झाली तरीही त्रिशाची तुफानी फलंदाजी सुरूच होती. यानंतर गोंगडी त्रिशाने १८व्या षटकात शतक झळकावून ICC अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकात नवा इतिहास लिहिला. अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात शतक झळकावणारी गोंगडी त्रिशा ही जगातील पहिली खेळाडू ठरली. याआधी एकाही फलंदाजाला १०० धावांचा आकडा गाठता आला नव्हता. युवा सलामीवीर गोंगडी त्रिशाने ५९ चेंडूंत १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ११० धावांची खेळी केली.
१८६.४४ च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या या ११० धावांसह त्रिशाच्या आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकाच्या चालू हंगामातील एकूण धावसंख्या आता २३० धावांवर पोहोचली आहे. अशाप्रकारे, ती टूर्नामेंटची टॉप स्कोअरर बनली आहे.
त्रिशाच्या शतकाच्या जोरावर भारताने २० षटकांत २०८ धावांचा डोंगर उभारला. यानंतर त्रिशाने गोलंदाजी करतानाही आपली चमक दाखवली. त्रिशाने २ षटकांत ६ धावा देत ३ विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्याशिवाय आयुषी शुक्ला हिने ४ विकेट्स तर वैष्णवी शर्मा हिने ३ विकेट्स घेतल्या. परिणामी स्कॉटलंडचा संघ ५८ धावांवर सर्वबाद झाला. यानंतर भारतीय संघ आता उपांत्य फेरीत खेळताना दिसणार आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघही भारतासह पोहोचले आहेत.