Virat Kohli on World Cup 2023: भारताचा महान फलंदाज विराट कोहली आगामी आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. आशिया चषक ३० ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे. यावेळी तर एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन भारत करणार आहे. त्याची सुरुवात ५ ऑक्टोबरला होणार असून अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. या मोठे स्पर्धेदरम्यान दडपण असेल हे मान्य करून कोहली म्हणाला की, “केवळ चाहतेच नाही तर भारतीय क्रिकेट संघालाही विश्वचषक जिंकायचा आहे. गेल्या १५ वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाची सेवा करत असलेल्या कोहलीने सांगितले की, “मला आव्हाने घ्यायला आवडतात.”
विराट कोहली म्हणाला, “तुमच्यासमोर कोणतेही आव्हान असो, तुम्ही ते नेहमी सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे. मी नेहमी अशा आव्हानांची वाट पाहत असतो. जेव्हा तुमच्या मार्गावर कोणतरी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्ही जोमाने त्याला प्रत्युतर दिले पाहिजे. त्यापासून तुम्ही मागे हटता कामा नये. १५ वर्षांनंतरही, मला स्पर्धात्मक खेळ खेळायला आवडतो. विश्वचषक २०२३हे मला उत्तेजित करणारे एक आव्हान आहे. मला नवीन आव्हाने स्वीकारायला आवडतात, त्यातून मला एका वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळते.”
किंग कोहली पुढे म्हणाला, “दबाव हा नेहमीच असतो. चाहते नेहमी म्हणतात की, आम्हाला (संघाला) यावेळी आयसीसी कप जिंकायचा आहे. जे त्यांच्या मनात आहे तेच आमच्याही मनात आहे. मला यापेक्षा जास्त काही सांगायला आवडणार नाही. त्यामुळे मी योग्य ट्रॅकवर आहे. खरे सांगायचे तर मला माहित आहे की संघाकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत आणि लोकांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या आहेत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हालाही ट्रॉफी जिंकावीशी वाटते, त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू.”
विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंकणे हे काही नवीन नाही. २००८मध्ये आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत त्याने भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर २०११ मध्ये मायदेशात ५० षटकांचा विश्वचषक जिंकणाऱ्या एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचाही तो भाग होता.
विराट यावर म्हणाला, “२०११ मध्ये विश्वचषक जिंकणे हे माझ्या कारकिर्दीचे मुख्य आकर्षण आहे. त्यावेळी मी २३ वर्षांचा होतो आणि कदाचित मला त्या वयात त्याची महानता समजली नसेल. पण आता वयाच्या ३४व्या वर्षी आणि इतके विश्वचषक खेळूनही जे आम्ही जिंकू शकलो नाही, त्यावेळी मला २०११च्या वर्ल्डकपवेळी सर्व वरिष्ठ खेळाडूंच्या भावना काय असतील याचा मी विचार करतो. सचिन तेंडुलकर यांच्यासाठी तो आणखीनच जास्त होता कारण हा त्यांचा शेवटचा विश्वचषक होता. तोपर्यंत त्यांनी अनेक विश्वचषक खेळले होते आणि मुंबईत आपल्या घरी जिंकणे त्यांच्यासाठी खूप खास होते, म्हणजे ती घडलेली घटना एका स्वप्नासारखी होती.”
२०११च्या विश्वचषकापूर्वी आणि त्यादरम्यान खेळाडूंवर पडलेल्या दबावाची आठवणही कोहलीने सांगितली. तो म्हणाला, “मला आठवते की आम्ही प्रवास करत असताना सर्व खेळाडूंवर किती दबाव होता. सुदैवाने त्यावेळी सोशल मीडिया एवढा सक्रिय नव्हता. खरे सांगू त्यावेळी जर सोशल मीडिया असता तर आमच्यासाठी विश्वचषक हे एक दिवास्वप्न ठरले असते. आम्हाला त्यावेळी एकच गोष्ट माहित होती ती म्हणजे वर्ल्ड कप जिंकायचा आहे. वरिष्ठ खेळाडू नेहमी उत्साहात असायचे आणि दडपण सहन करायचे. ते दिवस खूप भारी होते. विश्वचषक जिंकल्यानंतरची ती रात्र कधीच विसरू शकत नाही.”