आतापर्यंत भारताला एकदाही चॅम्पियन्स करंडक जिंकता आलेला नाही, पण हे जरी खरे असले तरी या वेळी आमच्यासाठी जिंकण्याची चांगली संधी आहे. हा अखेरचा चॅम्पियन्स करंडक असल्यामुळे आम्हाला अखेरची संधी असेल, त्याचबरोबर संपूर्ण संघ पूर्णपणे फिट आहे. नुकतेच आयपीएल संपल्याने त्यांचा चांगला सरावही झाला आहे, इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेऊ शकलो, तर नक्कीच जेतेपद पटकावता येईल, असा विश्वास भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने स्पर्धेला जाण्यापूर्वी दिला.
संघ चांगलाच समतोल
या स्पर्धेसाठीचा संघ पाहिला तर त्यामध्ये योग्य तो समतोल दिसून येतो. चांगले फलंदाज आणि गोलंदाज संघात आहेत. संघात जास्त युवा खेळाडू असले तरी त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून आम्ही स्पर्धेत उतरू व जिंकण्याचा प्रयत्न करू.
भारत-पाकिस्तान सामन्याचे दडपण
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश ज्यावेळी आमने-सामने येतात तेव्हा अधिक दडपण येते. चॅम्पियन्स करंडकामध्ये आमची त्यांच्याशी गाठ पडणार आहे. पाकिस्तानच्या संघात गुणवान युवा खेळाडू आहेत, सईद अजमलसारखा दर्जेदार फिरकीपटू आहे. त्यांचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.
आयपीएलनंतर चांगले निकाल नाहीत
आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आयपीएलनंतर भारताला मोठय़ा स्पर्धा जिंकता आलेल्या नाहीत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आहोत आणि त्यामुळेच या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आहे.
बीसीसीआयने दाद दिली -फ्लेचर
चांगली कामगिरी होत नसूनही बीसीसीआयने तुमची मुदत वाढवली, असे विचारल्यावर संघाचे प्रशिक्षक डंकन फ्चेलर म्हणाले की, माझ्या कार्यकालात सुरुवातीला चांगली कामगिरी झाली नाही, पण कालांतराने चांगली कामगिरी संघाकडून होत गेली. गेल्या काही सामन्यात भारताने चांगली कामगिरी केली असून त्याला बीसीसीआयने दाद दिली आहे. चॅम्पियन्स करंडकासाठी आमच्या संघात बरेच युवा खेळाडू आहेत आणि त्यांना यामधून बरेच शिकता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा