वृत्तसंस्था, अम्मान (जॉर्डन)
भारताच्या काजलने कनिष्ठ (१७ वर्षांखालील) जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी सुवर्णपदकाची कमाई केली. अन्य एका सुवर्ण लढतीत महाराष्ट्राची श्रुतिका पाटील पराभूत झाली. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील ४० किलो वजनी गटात बाला राज आणि ५३ किलो वजनी गटात मुस्कानने कांस्यपदक पटकावले. स्पर्धेत मुलींच्या गटात भारताने पाच सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके कमावली.
स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या अंतिम लढतीत काजलने नियोजनबद्ध कुस्ती खेळताना युक्रेनच्या ओलेक्सांड्रा रिबाकचे आव्हान ९-२ असे गुणांवर सहज परतवून लावले. प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व आणि ताबा राखताना काजलने बचावही भक्कम ठेवला आणि रिबाकला संधी मिळू दिली नाही. त्यापूर्वी अंतिम फेरीपर्यंत सहज विजय मिळवणाऱ्या श्रुतिकाला जपानच्या यू कात्सुमेच्या आक्रमकतेचा सामना करता आला नाही. कमालीच्या वेगवान हालचाली करणाऱ्या कात्सुमेने श्रुतिकाला ३९ सेकंदातच तांत्रिक वर्चस्वावर १३-० असे पराभूत केले.
दरम्यान, बाला राजने जपानच्या मोनाका युमेकावाचा ११-५ असा, तर मुस्कानने अमेरिकेच्या मारी गोन्झालेसचा १२-२ असा पराभव करून कांस्यपदकाची कमाई केली.मुलांच्या फ्री-स्टाईल गटात भारताच्या पदरी निराशा पडली. पाच वजनी गटांपैकी केवळ दोनमध्ये भारतीय मल्लांना एकेक विजय मिळवता आला. हर्ष आणि विवक यांनाच थोडाफार प्रतिकार करता आला. अन्य तीनही मल्ल पात्रता फेरीतच गारद झाले.