एकेरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जागतिक सांघिक लढतींवर पाणी सोडण्याची भूमिका अव्वल महिला स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलने घेतली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय दीपिकाने घेतला आहे. ‘‘राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक पटकावणे, हे यंदाच्या वर्षांतले माझे उद्दिष्ट होते. ते साध्य झाले. यावर्षी माझी कामगिरी सुरेख झाली आहे. दोन्ही प्रतिष्ठांच्या स्पर्धानी यंदाच्या वर्षांतल्या वेळापत्रकाचा मोठा कालावधी व्यापला होता. या स्पर्धामुळे स्क्वॉशमधील काही महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये मी खेळू शकले नव्हते. क्रमवारीतील माझ्या स्थानातही घसरण झाली,’’ असे दीपिकाने सांगितले. ती पुढे म्हणाली, ‘‘देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे. आता मला व्यावसायिक स्क्वॉशवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मला पुन्हा अव्वल दहामध्ये स्थान पटकवायचे आहे. त्यामुळे सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत मी का खेळणार नाही, याचे कारण स्पष्ट आहे.’’ दीपिकाच्या अनुपस्थितीत सांघिक स्पर्धेत जोश्ना चिनप्पा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार असून अनाका अलानकामोनी, संचिका इंगळे आणि हर्षित कौर भारतीय संघाचा भाग असणार आहेत.’’
जागतिक एकेरीचे लक्ष्य गाठण्यासाठी दीपिकाची सांघिक स्पर्धेमधून माघार
एकेरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जागतिक सांघिक लढतींवर पाणी सोडण्याची भूमिका अव्वल महिला स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलने घेतली आहे.
First published on: 10-11-2014 at 07:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias no 1 womens squash player dipika pallikal not in world team championships squad