दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला टी२० विश्वचषकात भारतीय संघाने आपला पहिला सामना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळला. केपटाऊन येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला ७ गडी राखून पराभूत करत विश्वचषकात विजयी सुरुवात केली. जेमिमा रॉड्रिग्ज व रिचा घोष यांनी विजयात निर्णयाक भूमिका बजावली. यावर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने भारतीय महिला संघाचे कौतुक करत विश्वचषक जिंकून या असे देवाकडे साकडे देखील घातले आहे.
सामना जिंकल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने महिला संघाचे ट्वीट करत अनोख्या पद्धतीने अभिनंदन केले. किंग कोहली म्हणाला की, “हीच ती वेळ जेव्हा दबाव झेलून विजय कसा विरोधी संघाच्या तोंडातून खेचून आणायचा असतो हे तुम्ही दाखवून दिले. आमच्या महिला संघाने पाकिस्तानविरुद्ध हायहोल्टेज खेळात आणि कठीण धावांचा पाठलाग करताना अफलातून विजय मिळवला. महिला संघ आम्ही खेळत असलेल्या प्रत्येक स्पर्धेत अशी मोठी झेप घेत आहे आणि त्यामुळे मुलींच्या संपूर्ण पिढीला या खेळात सहभागी होण्यासाठी आणि महिला क्रिकेटला उंचावर नेण्यासाठी प्रेरणा मिळेल. तुम्हा सर्वांना देव अधिक शक्ती देवो.”
उभय संघांनी या सामन्यातून आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात केली. पाकिस्तानची कर्णधार बिस्मा मारूफने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दीप्ती शर्मा हिच्या गोलंदाजीमुळे पाकिस्तान संघाला सुरुवातीला आक्रमक खेळ करता आला नाही. त्यांनी ७.३ षटकात ३ बाद ४३ अशी मजल मारली होती. पाकिस्तानची कर्णधार बिस्मा मारूफने एक बाजू लावून धरत संघाचा धावफलक हलता ठेवला होता.
भारतीय संघ पाकिस्तानला कमी धावसंख्येवर रोखणार असे वाटत असताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आयेशा नजीम हिने आक्रमक खेळ दाखवला. तिने मारूफसह अखेरपर्यंत नबाद राहत २५ चेंडूंवर ४३ धावांची वेगवान खेळी केली. तर, मारूफने नाबाद ६८ धावा करत संघाला १४९ पर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला शफाली वर्मा व यास्तिका भाटियाने ५.३ षटकात ३८ धावांची सलामी दिली. भाटिया बाद झाल्यानंतर शफालीने जेमिमासह धावांचा वेग वाढवला. शफालीने ३३ धावांची खेळी केली. कर्णधार हरमनप्रीतने आक्रमक १६ धावांचे योगदान दिले. हरमन बाद झाल्यानंतर सामना पाकिस्तानच्या दिशेने झुकला असतानाच यष्टीरक्षक रिचा घोष हिने पाकिस्तान संघावर प्रती आक्रमण केले. तिने पाच चौकार वसूल करत पाकिस्तानच्या आव्हानातील हवा काढून घेतली.
१८व्या षटकात रिचाने सलग तीन चौकार मारत पहिल्या सामन्याचा मार्गच बदलला. यानंतर तीने १९व्या षटकात पुन्हा तीन चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जेमिमाहला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी एका धावेची गरज होती. तीने चौकार मारून आपले अर्धशतकही पूर्ण केले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.