India tour of Sri Lanka: भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या क्रिकेट कॅलेंडरमधून ही बाब समोर आली आहे. भारतीय संघ तेथे तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंका क्रिकेटला (SLC) याचा मोठा फायदा होऊ शकतो. आयसीसीने याच महिन्यात श्रीलंकेवर बंदी घातली होती. मात्र, ते द्विपक्षीय मालिकेत भाग घेऊ शकतात.
श्रीलंका क्रिकेटने बुधवारी जाहीर केले की, भारत पुढील वर्षी टी-२० विश्वचषकानंतर जुलै २०२४ मध्ये ३ वन डे आणि ३ टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करेन. आयसीसीने याच महिन्यात श्रीलंकन क्रिकेट बोर्डावर बंदी घातली होती. मात्र, ते द्विपक्षीय मालिकेत भाग घेऊ शकतात, ज्याचा संघाला फायदा होईल. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे, त्यात ते २-१ने सध्या पुढे आहेत. मालिकेत दोन सामने अजून बाकी आहेत. या मालिकेत सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करत आहे.
क्रिकेटमध्ये सरकारी हस्तक्षेपामुळे श्रीलंकेवर आयसीसीने बंदी घातली आहे. त्यामुळे अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. आता ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. बंदी असूनही, श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघांना (पुरुष आणि महिला) त्यांच्या द्विपक्षीय मालिका खेळण्यास आयसीसीने परवानगी दिली आहे. श्रीलंका क्रिकेटने जाहीर केलेल्या २०२४ कॅलेंडरनुसार, भारत जुलै-ऑगस्ट दरम्यान एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेत जाणार आहे. विशेष म्हणजे, श्रीलंकेचा माजी अर्जुन रणतुंगाने बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यावर, “तेच श्रीलंकन क्रिकेट चालवतात, सगळे निर्णय तेच घेतात” असा आरोप केल्यानंतरही भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे.
श्रीलंका इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही खेळणार आहे
श्रीलंकेच्या पुरुष संघाला २०२४ मध्ये ५२ आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. या कालावधीत संघ १० कसोटी, २१ एकदिवसीय आणि २१ टी-२० सामने खेळणार आहे. यामध्ये श्रीलंका संघ टी-२० विश्वचषकादरम्यान खेळणार असलेल्या सामन्यांचा समावेश नाही. भारताव्यतिरिक्त श्रीलंकेलाही इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल. इंग्लंडनंतर हा संघ नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याच्या ट्वीटर वर ट्वीट करून दिली आहे.