‘‘दसरथा स्टेडियमवर शनिवारी इराणविरुद्ध लढतीसाठी भारतीय संघ दाखल झाला. लढत दुपारी एक वाजता होती. सकाळी १०-१०.३०च्या सुमारास  आम्ही येथे सरावासाठी आलो. नंतर साधारण १२ वाजता ड्रेसिंग रूममध्ये विश्रांती घेत असताना अचानक सर्व काही हलू लागले. धरणीकंपाचे तांडव आम्ही मैदानाच्या मधोमध बसून पाच तास स्वत: अनुभवले. जिथे आम्ही सकाळी सराव केला तेच स्टेडियम आमच्या नजरेसमोर पार कोलमडून गेले होते..’’  नेपाळमधील भयंकर संकटातून भारताचा १४ वर्षांखालील मुलींचा फुटबॉल संघ रविवारी दिल्लीत सुखरूप दाखल झाला. मुंबईकर भाग्यश्री दळवी सोमवारी सकाळी घरी परतली. नेपाळमधील भयानक विध्वंसाचे अनुभव तिने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
मुंबई विमानतळावर तिला घेण्यासाठी आलेल्या आईला बघताच ती बिलगली. मुंबईत उतरल्यानंतरही पायाखालची जमीन हलत असल्याचा भास भाग्यश्रीला होत होता.
‘‘दसरथा स्टेडियममध्ये आम्ही सकाळी सराव केला. त्यानंतर दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. आमच्या प्रशिक्षकांनी आम्हाला मैदानाच्या मधोमध नेले. त्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भूकंपाचे तांडव आम्ही मैदानात
बसून अनुभवले. भूकंपाच्या धक्क्यांनी स्टेडियम मोडकळीला आले होते. स्टेडियमचे खांब कोसळून पडले होते. त्या मैदानावर बसून हा विध्वंस पाहण्याखेरीज आम्ही काहीच करू शकलो नाही. या भयकंपित पाच तासांत काहीच सूचत नव्हते. तेव्हा पाणी सोडल्यास खाण्यासाठी काहीच नव्हते. प्रशिक्षक व सहायकांनी आमची खूप काळजी घेतली. धक्के काहीसे थांबल्यावर आम्ही हॉटेलमध्ये आलो. परंतु ज्या मार्गावरून आम्ही सकाळी स्टेडियमला आलो होतो, तो मार्ग मात्र आता भकास झाला होता. सर्वत्र इमारतींचे ढिगारे दिसत होते. ते पाहून आणखी भीती वाटू लागली. पुन्हा भूकंपाच्या भीतीमुळे हॉटेलच्या लॉनमध्ये झोपण्याची सूचना प्रशिक्षकांनी केली. सारी रात्र आम्ही जीव मुठीत घेऊन काढली. प्रशिक्षक मात्र रात्रभर जागे राहून आमची काळजी घेत होते..’’ भाग्यश्री सांगत होती.
काठमांडू विमानतळावर रविवारी सकाळी ८.३० वाजता भारतीय संघ मायदेशी परतण्यासाठी पोहोचला. भारत सरकार आणि अखिल
भारतीय फुटबॉल महासंघाच्या प्रयत्नांमुळे सर्वप्रथम या संघाला मायदेशी पाठवण्याची व्यवस्था केली होती.
‘‘घरी जाण्याच्या बातमीनेच मनातील भीती काहीशी दूर झाली होती. मात्र तोच पुन्हा एकदा भूकंपाने हादरा दिला. रविवारी दुपारी झालेल्या या भूकंपामुळे विमानतळावर धावपळ सुरू झाली आणि पुन्हा भीतीने मनात घर केले. मात्र, सैन्य दलाच्या विमानाने भारतात पोचल्यावर दिलासा मिळाला. पण तो अनुभव मात्र मनावर कायमचा ठसला. आता तेथे अडकलेल्या इतरांची चिंता वाटतेय,’’ असे भाग्यश्री म्हणाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझी मुलगी ज्या हॉटेलमध्ये उतरली होती, तेथील संपर्कही तुटला होता. त्यामुळे काही माहिती मिळत नव्हती. मात्र अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने सतत संपर्क करून आम्हाला दिलासा दिला. दोन महिने भाग्यश्री आमच्यापासून दूर आहे. आज तिची भेट झाल्यावर जिवात जीव आला.
– हेमा दळवी, भाग्यश्रीची आई

स्वदेश घाणेकर, मुंबई</strong>

माझी मुलगी ज्या हॉटेलमध्ये उतरली होती, तेथील संपर्कही तुटला होता. त्यामुळे काही माहिती मिळत नव्हती. मात्र अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने सतत संपर्क करून आम्हाला दिलासा दिला. दोन महिने भाग्यश्री आमच्यापासून दूर आहे. आज तिची भेट झाल्यावर जिवात जीव आला.
– हेमा दळवी, भाग्यश्रीची आई

स्वदेश घाणेकर, मुंबई</strong>