नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपात अडकलेला भारताचा १४ वर्षांखालील मुलींचा फुटबॉल संघ मायदेशी सुखरूप परतला आहे. संघातील सर्व खेळाडू सुरक्षित आहेत. ते रविवारी दिल्लीतच राहणार असून, सोमवारी आपापल्या शहरांकडे रवाना होतील, अशी माहिती अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने दिली आहे. आशियाई फुटबॉल महासंघाच्या दक्षिण आणि मध्य विभागीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघ काठमांडूला रवाना झाला होता. शनिवारी तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत भारतीय संघाचा इराणशी मुकाबला होणार होता. दशरथ स्टेडियमवर दुपारी एक वाजचा हा सामना होणार होता. मात्र एक तास आधी प्रचंड भूकंपाने नेपाळ हादरले. या दुर्देवी निसर्ग आपत्तीमुळे हा सामना रद्द करण्यात आला. भारतीय संघाने शनिवारची रात्र हॉटेलच्या परिसरातच भीतीदायक वातावरणात काढली. रविवारी पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या विमानाचे प्रयाण लांबले. अखेर संध्याकाळी ४ वाजता लष्कराच्या विमानातून संघ मायदेशी परतला.