भारताविरुद्ध येथे होणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत विजय मिळविण्यासाठी इंडोनेशियास चमत्काराची अपेक्षा आहे. ही लढत येथे ५ ते ७ एप्रिल या कालावधीत होणार आहे.
आशिया-ओशेनिया गटाच्या या लढतीत भारताचा विजय हा निश्चित मानला जात आहे. सोमदेव देववर्मन, युकी भांब्री यांच्या पुनरागमनामुळे ही लढत भारत सहज जिंकेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच इंडोनेशियास जर विजय मिळवायचा असेल तर अशक्य कामगिरी करून दाखवावी लागणार आहे.
इंडोनेशियाचे न खेळणारे कर्णधार हेन्री सुसिलो प्रमोनो यांनी सांगितले, आमच्या खेळाडूंमध्ये अनपेक्षित कामगिरी करण्याची क्षमता आहे. कोर्टवर केव्हाही आश्चर्यजनक गोष्टी घडू शकतात. त्यामुळेच आम्ही आशा सोडलेल्या नाहीत. एकेरी व दुहेरीत कोणास खेळावयाचे याचा निर्णय आम्ही अद्याप घेतलेला नाही. सामन्याची कार्यक्रमपत्रिका निश्चित होण्यापूर्वी एक तास अगोदर हा निर्णय घेतला जाईल.
इंडोनेशियाचा अव्वल दर्जाचा खेळाडू ख्रिस्तोफर रुंग्कट याने सांगितले, दडपणाखाली खेळण्याची आम्हाला सवय आहे. संघाच्या विजयाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती जबाबदारी पेलण्यास मी समर्थ आहे. माझ्याकडून संघास मोठय़ा कामगिरीची अपेक्षा आहे मी सर्वोत्तम कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. येथील टेनिस कोर्ट्स चांगल्या दर्जाची आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा