थॉमस चषकामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या एचएस प्रणॉयने इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आपला फॉर्म कायम ठेवला आहे. त्याने आज (१६ जून) हाँगकाँगच्या एनजी का लाँग अँगसवर सरळ गेममध्ये विजय मिळवून इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन सुपर १००० स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. २९ वर्षीय प्रणॉयने ४१ मिनिटे चाललेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात एनजी लाँगचा २१-११, २१-१८ असा पराभव केला.

सध्या जागतिक क्रमवारीत १२व्या क्रमांकावर असलेल्या लाँगवर प्रणॉयचा हा चौथा विजय होता. प्रणॉयचा पुढील सामना डेन्मार्कच्या रासमुस गेमके किंवा फ्रान्सच्या ब्रिस लेव्हरडेझ यांच्याशी होईल.

पुरुष एकेरीतील पहिल्या गेमच्या सुरुवातीपासूनच प्रणॉयने प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखले. क्रॉस कोर्ट जंप स्मॅशसहच्या मदतीने ११-३ अशी आघाडी घेतली होती. मात्र, मध्यांतरानंतर झालेल्या काही चुकांमुळे एनजी लाँगने काही गुण मिळवले. त्यानंतर प्रणॉयने फटक्यांचे योग्य मिश्रण करून लाँगला अडचणीत आणले.

राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेता आरएमव्ही गुरुसाईदत्त हे प्रशिक्षक म्हणून तिथे उपस्थित होते. त्यांनी वेळोवेळी प्रणॉयलाही योग्य सल्ले दिल्याने त्याला मदत झाली. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर गुरुसाईदत्त भारतीय संघासोबत पहिल्यांदाच प्रशिक्षकाच्या भूमिकेत आले आहे.

Story img Loader