पीटीआय, जकार्ता
सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या तारांकित जोडीने आपल्या कामगिरीचा चढता आलेख कायम राखताना रविवारी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. ‘सुपर १०००’ दर्जा प्राप्त स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली.
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सात्त्विक-चिराग जोडीने अंतिम सामन्यात मलेशियाच्या आरोन चिया व सोह वूई यिक या जागतिक विजेत्या जोडीला २१-१७, २१-१८ असे सरळ गेममध्ये पराभूत करत प्रथमच ‘सुपर १०००’ दर्जा असणारी स्पर्धा जिंकली. दोन्ही जोडय़ांमध्ये सामन्याच्या सुरुवातीपासूनच चांगली चुरस पाहायला मिळाली. सात्त्विक-चिराग जोडीने पहिल्या गेममध्ये ११-९ अशी आघाडी घेतली आणि आपल्या कामगिरीत सातत्य राखताना पहिला गेम २१-१७ असा जिंकला. भारतीय जोडीने मलेशियाच्या जोडीला सहजासहजी गुण मिळवू दिले नाहीत. दुसरा गेम एक वेळ ६-६ असा बरोबरीत होता. मात्र, भारतीय जोडीने जोरदार खेळ करताना १८-११ अशी आघाडी घेतली. यानंतर मलेशियन जोडीने पुनरागमन करत भारतीय जोडीची आघाडी २०-१८ अशी कमी केली. मात्र, सात्त्विक-चिराग जोडीने पुढील निर्णायक गुण मिळवत गेमसह सामना जिंकला.
बर्मिगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीने आपल्या कारकीर्दीत नऊ प्रयत्नांत प्रथमच दुसऱ्या मानांकित चिया व यिक या मलेशियन जोडीला नमवले. यासह इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळवणारी सात्त्विक-चिराग पहिली भारतीय जोडी ठरली. यापूर्वी, सायना नेहवाल (२०१० व २०१२) आणि किदम्बी श्रीकांत (२०१७) यांनी एकेरीत जेतेपद मिळवले होते.
१ सात्त्विक-चिराग जोडीने सुपर १००, सुपर ३००, सुपर ५००, सुपर ७५० आणि सुपर १००० दर्जा असणाऱ्या स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय जोडी बनण्याचा मान मिळवला.
१४ ‘बीडब्ल्यूएफ’ स्पर्धात सात्त्विक -चिराग जोडीने १७ पैकी १४ अंतिम सामने जिंकण्याची अलौकिक कामगिरी केली आहे. त्यांनी तब्बल ८२.३५ टक्के अंतिम सामने जिंकले आहेत.
सात्त्विक-चिरागची चमकदार कामगिरी
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : सुवर्णपदक
थॉमस चषक : सुवर्णपदक
जागतिक अजिंक्यपद स्पर्धा : कांस्यपदक
सय्यद मोदी स्पर्धा (सुपर ३०० दर्जा) : जेतेपद
थायलंड, भारतीय खुली स्पर्धा (सुपर ५०० दर्जा) : जेतेपद
फ्रेंच खुली स्पर्धा (सुपर ७५० दर्जा) : जेतेपद
आम्ही या स्पर्धेसाठी चांगली तयारी केली होती. या स्पर्धेत आम्हाला पाठिंबा मिळेल याची अपेक्षा होतीच. प्रेक्षकांनी आम्हाला आठवडाभर खूप प्रोत्साहन दिले. आम्ही अंतिम फेरीत चांगला खेळ केला. मलेशियन जोडीविरुद्ध आम्हाला यापूर्वी विशेष कामगिरी करता आली नव्हती. मात्र, या वेळी आम्ही एकेक गुण मिळवण्यावर भर दिला. त्यामुळेच आम्हाला सामना जिंकता आला. – सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी
मलेशियाच्या चिया व यिक जोडीविरुद्ध खेळताना यापूर्वीच्या आठ सामन्यांत आम्हाला सर्वोत्तम खेळ करता आला नव्हता. मात्र, या सामन्यात आम्ही योजनेनुसारच खेळ केला. तेसुद्धा मनुष्य आहेत आणि त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात हे आम्ही स्वत:ला सांगत राहिलो. आम्ही आघाडी मिळवल्यानंतर त्यांना पुनरागमनाची संधी दिली नाही. हे जेतेपद आमच्यासाठी खूप खास आहे. – चिराग शेट्टी