Indonesia Open : इंडोनेशियन ओपन स्पर्धेत आज सलामीच्या सामन्यात भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याचे आव्हान संपुष्टात आले. जपानच्या केंतो मोमोटा याने श्रीकांतला १२-२१, २१-१४, २१-१५ असे पराभूत केले.

गेल्या वर्षी झालेल्या इंडोनेशियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या श्रीकांतकडून या स्पर्धेत खूप अपेक्षा होत्या. जकार्ता येथे सुरु असलेल्या इंडोनेशियन ओपन स्पर्धेत श्रीकांतसमोर आज पहिल्या फेरीत जपानच्या केंतो मोमोटा याचे आव्हान होते. या स्पर्धेत श्रीकांतला चौथे मानांकन मिळाले होते. तर मोमोटा हा बिगरमानांकित बॅडमिंटनपटू होता. श्रीकांतने पहिला गेम १२-२१ असा जिंकला. त्यामुळे त्याचे सामन्यावर वर्चस्व स्पष्ट झाले.

त्यानंतर तो पुढील गेम जिंकून सरळ गेममध्ये विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र जपानच्या मोमोटाने दमदार पुनरागमन केले. त्याने दुसऱ्याच गेममध्ये श्रीकांतला २१-१४ अशा फरकाने पराभूत केले आणि सामन्यात बरोबरी मिळवली. त्यानंतर तिसरा गेम चुरशीचा होणार याची खात्री होती. त्यानुसार तिसऱ्या गेमला सुरुवात झाली. या गेमवरही मोमोटाने वर्चस्व राखले आणि तो गेम २१-१५ असा जिंकत सामना आपल्या नावावर केला.

या पराभवाबरोबर श्रीकांतला या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.

Story img Loader