Indonesia Open : जकार्ता येथे सुरु असलेल्या इंडोनेशियन ओपन स्पर्धेत आज भारताची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने विजयी सलामी दिली. थायलंडच्या पोर्न्पावी चोचुवाँग हिचा २१-१५, १९-२१, २१-१३ असा पराभव केला. यंदाच्या हंगामात आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नसल्याने या स्पर्धेतील सिंधूच्या कामगिरीकडे सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे.
सिंधूला या स्पर्धेत तिसरे मानांकन देण्यात आले असून तिचा सलामीचा सामना बिगरमानांकित चोचुवाँग हिच्याशी होता. त्यामुळे हा सामना सिंधूसाठी तुलनेने सोपा होता. पहिल्या गेममध्ये सिंधूने सुरुवात चांगली केली. पण चोचुवाँगने जोरदार खेळ करत १०-१० अशी बरोबरी साधली होती. पण अनुभवी सिंधूने पहिला गेम २१-१५ असा समाधानकारक फरकाने जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सामना खूपच अटीतटीचा झाला. या गेममध्ये केवळ २ गुणांच्या फरकाने सिंधूला गेम गमवावा लागला. चोचुवाँगने २१-१९असा तो गेम आपल्या नावावर केला आणि सामन्यात बरोबरी राखली. त्यानंतर मात्र तिसऱ्या सेटमध्ये सिंधूने आपला अनुभव पणाला लावत सुंदर खेळ केला. या खेळाच्या जोरावर सिंधूने तिसरा गेम २१-१३ अशा मोठ्या फरकाने जिंकला आणि स्पर्धेत विजयी सलामी दिली.
पुढील फेरीत तिचा सामना जपानच्या अया ओहोरी हिच्याशी होणार आहे.