भारताच्या अजय जयराम व आर.एम.व्ही.गुरुसाईदत्त यांनी इंडोनेशियन बॅडमिंटन सुपरसीरिजमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. भारताच्या बी.साईप्रणितने माजी विश्वविजेता व ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता तौफिक हिदायतवर सनसनाटी विजय नोंदविला. मात्र भारताचा ऑलिम्पिकपटू पारुपल्ली कश्यप याला पराभवाचा धक्का बसला.
 साईप्रणित याने उत्कंठापूर्ण लढतीत हिदायतला १५-२१, २१-१२, २१-१७ असे पराभूत केले. पहिली गेम गमावल्यानंतर चतुरस्र खेळाचा प्रत्यय घडवित त्याने हा सामना जिंकला. हिदायतने अथेन्स ऑलिम्पिकमध्ये सुवर्णवेध घेतला होता. त्याला आता लंडन ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या ली चेंग वेई याच्याशी खेळावे लागणार आहे.
जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असलेल्या कश्यप याला जपानच्या शाओ सासकी याने २१-७, २१-८ असे एकतर्फी लढतीत गारद केले. हा सामना त्याने केवळ अध्र्या तासात जिंकला. जयराम याने चुरशीच्या लढतीनंतर इंडोनेशियाच्या रियान्तो सुबाग्जा याच्यावर २२-२०, ८-२१, २१-१२ अशी मात केली. त्याला पुढच्या फेरीत चौथ्या मानांकित सोनी द्वीकुंकोरो याच्याशी खेळावे लागणार आहे. गुरुसाई याने आंद्रे कुर्निवान तेद्जोनो या स्थानिक खेळाडूवर २२-२०, २१-१६ असा संघर्षपूर्ण विजय नोंदविला.
महिलांच्या दुहेरीत भारताच्या अपर्णा बालन व एन.सिक्की रेड्डी यांचे आव्हान संपुष्टात आले. स्थानिक खेळाडू गेबी रिस्तीयानी इमावान व तियारा रोझालिया नुराईदाह यांनी त्यांच्यावर २१-१२, २१-१७ अशी मात केली. भारताच्याच प्रज्ञा गद्रे व अश्विनी पोनप्पा यांनी अपराजित्व राखताना मिंग तियानफु व लेई याओ (सिंगापूर) यांचा २१-१६, १५-२१, २२-२० असा पराभव केला.

Story img Loader