Anand Mahindra will gift a Thar car to Naushad Khan : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी क्रिकेटर सर्फराझ खानचे वडील नौशाद खान यांना नवीन थार भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आनंद महिंद्रा यांनी एक प्रेरणादायी पालक असल्याबद्दल नौशाद यांचे कौतुक केले. आनंद महिंद्रा म्हणाले नौशाद यांनी ही भेट स्वीकारल्यास हा त्यांचा गौरव आणि सन्मान असेल. महिंद्रा यांनी शुक्रवारी मायक्रोब्लॉगिंग साइट एक्सवर एका पोस्टद्वारे ही घोषणा केली. आता त्यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून लोक त्यांच्या उदारतेचे कौतुक करत आहेत.
आनंद महिंद्रा यांनी १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या अधिकृत हँडल वरून एक व्हिडीओ पोस्ट केला आणि लिहिले, “हिंमत, धैर्य आणि संयम गमावू नका, एक वडिल आपल्या मुलाला प्रेरणा देण्यासाठी यापेक्षा चांगले गुण कोणते देऊ शकतात. एक प्रेरणादायी पालक असल्याने नौशाद खान यांनी माझ्याकडून थारची भेट स्वीकारल्यास हा माझा बहुमान आणि सन्मान असेल.” आनंद महिंद्रा यांनी नौशाद खानला थार भेट देण्याची घोषणा केल्याने चाहत्यांना खूप आनंद झाला. याबद्दल ते आनंद महिंद्रा यांचे कौतुक करत आहेत.
सर्फराझ खानने पदार्पणातच झळकावले शानदार अर्धशतक –
सर्फराझ खानने कसोटी पदार्पणाच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ६२ धावांची जलद खेळी खेळली. सर्फराझने आपल्या खेळीत ९ चौकार आणि १ षटकार लगावला. मात्र, पहिल्या डावात तो थोडा दुर्दैवी होता आणि रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे तो धावबाद झाला. सर्फराझने बाद होण्यापूर्वी ज्या निर्भयतेने फलंदाजी केली त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.