भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील तिसऱ्या सामना खेळला जात आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या इशान किशनला संधी मिळाली. या संधीचे इशान किशनने सोने केले. त्याने आजच्या सामन्यात द्विशतक झळाकावत बरेच विक्रम मोडीत काढले. त्याचबरोबर आपल्या एकाच द्विशतकाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
कर्णधार रोहित शर्मा खेळला नाही. दुसऱ्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे तो संपूर्ण दौऱ्यातून बाहेर आहे. यानंतर सलामीची जोडी भारतासाठी चिंतेची बाब होती, कारण धवनही फॉर्मात नव्हता. या सामन्यातही तो लवकर बाद झाला. मात्र, रोहितच्या जागी संघात समाविष्ट झालेला इशान किशन वेगळ्याच इराद्याने क्रीझवर आला. त्याने आक्रमक फलंदाजी करताना बांगलादेशच्या गोलंदाजांवर तुटून पडला.
किशनने या सामन्यात १३१ चेंडूत २१० धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून २४ चौकार आणि १० षटकार निघाले. किशनने १६०.३१च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो भारताचा चौथा फलंदाज आहे. या अगोदर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्माने हा पराक्रम केला आहे.
इशान किशनने केवळ १०व्या एकदिवसीय सामन्यात ही शानदार खेळी केली आहे. सर्वात कमी चेंडूत द्विशतक झळकावण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. मात्र, इथपर्यंतचा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. इशानचे प्रशिक्षक उत्तम मजुमदार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची इशान सोबत पहिली भेट २००५ मध्ये झाली होता. तेव्हा इशानसोबत त्याचा मोठा भाऊ राजकिशनही उपस्थित होता.
भावाच्या जागी झाली होती निवड –
उत्तम मुझुमदार यांनी इशानचे वडील प्रणव कुमार पांडे यांना आपल्या मुलांना खेळासाठी नेहमीच प्रोत्साहन देण्याचे सांगितले होते. ते इशानच्या मोठ्या भावाला निवड करणार होते. त्याचवेळी त्यांनी इशानची फलंदाजी पाहिली. त्यानंतर ते या डावखुऱ्या फलंदाजावर खूप खूश झाले. इशानमध्ये त्यांना एक स्पार्क दिसला, असे ते सांगतात. इशानची मैदानावर चालण्याची आणि विचार करण्याची त्याची क्षमता पाहून मी खूप प्रभावित झाले. त्यामुळे त्यांनी राजकिशनला सोडून इशान किशनची निवड करण्याचा निर्णय घेतला होता.
इशानच्या आग्रहापुढे घरच्यांनी घेतले होते नमते –
इशान १२ वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबाने पाटणा सोडून रांचीला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, इशानला त्याच्या प्रशिक्षकाने शहर सोडण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून तो उच्च स्तरावर खेळण्याची तयारी करू शकेल. त्याची आई यासाठी तयार नव्हती, पण इशानच्या आग्रहापुढे अखेर कुटुंबाने रांचीला जाण्याचा निर्णय घेतला.
स्वयंपाक येत नाही म्हणून भांडी धुवायचा-
रांची येथे जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी इशानची सेल (स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) संघात निवड झाली. त्याला राहण्यासाठी एक खोलीचा क्वार्टर देण्यात आला होता. किशनसह चार ज्येष्ठ खेळाडू त्यात राहत होते. इशानला त्यावेळी स्वयंपाक येत नव्हता. तो फक्त भांडी धुण्याचे काम करायचा. एका शेजाऱ्याने त्याच्या वडिलांना सांगितले होते की, किशन कधी कधी रिकाम्या पोटी झोपायचा. किशनसोबत दोन वर्षे हेच चालले. नंतर कुटुंबाने रांचीमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला. त्यानंतर आई सुचित्रा त्यांच्यासोबत राहू लागल्या.
वयाच्या १५ व्या वर्षी रणजी संघात निवड झाली –
झारखंड रणजी संघात निवड झाली, तेव्हा किशन १५ वर्षांचा होता. यानंतर, १९ वर्षाखालील विश्वचषक २०१६ मध्ये तो टीम इंडियाचा कर्णधार होता. त्याने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध भारतीय संघासाठी पहिला टी-२० सामना खेळला. एकदिवसीय क्रिकेटमधील नऊ सामन्यांमध्ये किशनला आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. परंतु त्याच्या १०व्या सामन्यात त्याने इतिहास रचला. तसेच आता निवडकर्त्यांना विचार करायला भाग पाडले आहे. किशनने आपली लय कायम ठेवली तर तो २०२३ च्या विश्वचषकातही भारतासाठी डावाची सुरुवात करू शकतो