अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या यावेळी ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेत पहिल्यांदाच ४०० धावांचा टप्पा पार करण्यात यश मिळवले. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या धावसंख्येत सिंहाचा वाटा उचलण्याचे काम उस्मान ख्वाजा याने केले. त्याने यादरम्यान ४२२ चेंडूंचा सामना करत १८० धावा चोपल्या. त्यावर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहितच्या कॅप्टन्सीवर ताशेरे ओढत पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहेत.
अलीकडेच भारताचे माजी खेळाडू रवी शास्त्री यांनी इंदोर कसोटी सामन्यातील पराभवासाठी खेळाडूंच्या अतिआत्मविश्वासाला जबाबदार धरले होते. यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने जोरदार प्रत्युत्तर देत शास्त्रींच्या वक्तव्याला मूर्खपणाचे म्हटले आहे. त्याचवेळी रवी शास्त्रींनी पुन्हा एकदा रोहित शर्माच्या कर्णधारपदावर टीका केली आहे. चौथ्या कसोटी सामन्यात रोहितने घेतलेल्या काही निर्णयांना शास्त्रींनी चुकीचे म्हटले आहे.
चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी समालोचन करताना रवी शास्त्री म्हणाले, “मला वाटते की काल भारताने काही चुकीचे निर्णय घेतले. उमेश ३५ वर्षांचा असल्याने नवीन चेंडू घेणे योग्य ठरले नाही, शमीही तरुण नाही. त्याने खूप गोलंदाजी केली होती आणि तो थकला होता. अशा स्थितीत दोन्ही गोलंदाजांचे वय लक्षात घेता इतक्या लवकर नवीन चेंडू घेणे योग्य नव्हते.
कर्णधार म्हणून रोहित शर्माची मोठी परीक्षा – रवी शास्त्री
रोहित शर्माच्या कर्णधारपदाबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, “रोहित शर्माची कर्णधार म्हणून मोठी परीक्षा आहे.” ते पुढे म्हणाले की, “कर्णधार म्हणून त्याच्या कार्यकाळात सर्व गोष्टी वेगाने पुढे गेल्या आहेत. तीन दिवसात जिथे गोष्टी पूर्ण होतात अशा वळणावर तो कर्णधार आहे.” आपले बोलणे पुढे चालू ठेवत रवी शास्त्री म्हणाले की, “जेव्हा तुम्ही अशा खेळपट्टीवर खेळता जिथे विकेट मिळणे कठीण असते तेव्हा फलंदाजी चांगली होते. त्यामुळे कर्णधार म्हणून तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. त्याच्याकडे (रोहित शर्मा) सर्व कौशल्ये आहेत, हे त्याला आवश्यक आहे.
चौथा कसोटी सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण तिसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. पण भारतीय संघ WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी धडपडताना दिसत आहे. अशा स्थितीत भारताला चौथा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद ४८० धावा केल्या. ख्वाजाच्या १८० धावांच्या योगदानाव्यतिरिक्त युवा कॅमेरून ग्रीन याने देखील शतकी खेळी केली. नवव्या गड्यासाठी लायन व मर्फी यांनी ७० धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेला. भारतीय संघासाठी रविचंद्रन अश्विन याने सर्वाधिक सहा बळी टिपले.