बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे गरजेचे असते. अहमदाबाद कसोटीचा पहिला आणि दुसरा दिवस ऑस्ट्रेलियन संघाच्या नावावर राहिला. सलामीवीर उस्मान ख्वाजा याने जबरदस्त प्रदर्शन करत पहिले शतक पूर्ण भारतीय गोलंदाजांचा घामटा काढला, मात्र त्याचे द्विशतक हुकले. पण ख्वाजाच्या फलंदाजीवर कौतुकाचा वर्षावर होत आहे.
कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात उस्मान ख्वाजाने भारताविरुद्ध शानदार पहिले शतक लगावत भारतीय गोलंदाजांना अक्षरशः धुतले असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. तब्बल ४२२ चेंडू खेळूत दोन दिवस फलंदाजी करत दमदार दीडशतक पूर्ण केले, तो १८० धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलिया आता कधी डाव घोषित करते यावरच सामन्यातील पुढील गणिते अवलंबून आहेत. सध्या ४११-८ अशी धावसंख्या कांगारूंची झाली आहे. जर भारताला हा सामना जिंकायचा असेल तर एकदाच फलंदाजी करून चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत फलंदाजी करणे गरजेचे आहे. तरच शेवटच्या दिवशी खेळपट्टीचा फायदा उठवत त्यांना बाद करून टीम इंडियाला विजय साकारता येईल.
वसीम जाफरने केले ख्वाजाचे कौतुक
मराठमोळ्या मुंबईकर वसीम जाफरच्या मते भारतीय गोलंदाज उस्मान ख्वाजाच्या विरोधात अधिक चांगले प्रदर्शन करू शकत होते. खासकरून वेगवान गोलंदाजांनी ‘ओवर द विकेट’ गोलंदाजी केली पाहिजे होती, असे जाफरला वाटते. भारतीय गोलंदाजांच्या चुका दाखवून देताना जाफर म्हणाला, “ख्वाजाचा फुटवर्क खरोखर चांगला होता. मी समजू शकतो अश्विन राउंड द स्टंप्स गोलंदाजी करत आहे कारण यामुळे पायचीत आणि त्रिफळाचीत होण्याची शक्यता असते. पण वेगवान गोलंदाजांनी ‘ओवर द विकेट’ गोलंदाजी केली पाहिजे होती. ख्वाजाने अनेकदा वेगवान गोलंदाजाना निक करताना बाद झाला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने संपूर्ण दिवस गोलंदाजी करण्यापेक्षा तुम्ही चांगले प्रदर्शन करू शकत होता.”
तत्पूर्वी, चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून ४०९ धावा केल्या आहेत. सध्या उस्मान ख्वाजा १८० धावा करून क्रीजवर असून नॅथन लियॉन सहा धावांवर खेळत आहे. आतापर्यंत दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी २२ धावांची भागीदारी झाली आहे. आज ३० पेक्षा जास्त षटके खेळायला बाकी आहेत. आज भारताकडून रविचंद्रन अश्विन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने आज तीन विकेट घेतल्या. त्याने कॅमेरून ग्रीन (११४), अॅलेक्स कॅरी (०) आणि मिचेल स्टार्क (६) यांना बाद केले आहे. काल त्याने ट्रॅविस हेडलाही बाद केले होते.