* तिसरा कसोटी सामना आजपासून
* तिसऱ्या विजयासह मालिका जिंकण्यासाठी भारत उत्सुक
* हकालपट्टीच्या जखमेवर विजयाची मलमपट्टी करण्यास कांगारू सज्ज
कांगारूंच्या कळपात बंडाळी झालीए.. खेळाडूंच्या हकालपट्टीची झळ संघालाही चांगलीच बसलीए, तीही अशा वेळी जेव्हा मालिकेतला तिसरा आणि निर्णायक सामना खेळला जाणार आहे, त्यामुळे या सामन्यात उतरताना ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्ण ताकदीनिशी उतरू शकणार नाही, त्याचबरोबर मनोबलही खचलेले असेल.. पण जिद्दी आणि खुनशी ऑस्ट्रेलियन्स कधीही सहजासहजी हार मानत नाहीत.. भारतातील इतर खेळपट्टय़ांपेक्षा ऑस्ट्रेलियासाठी ही खेळपट्टी सर्वात फायदेशीर ठरणारी आहे, त्यामुळे हकालपट्टीच्या जखमेवर विजयासाठी मलमपट्टी करण्यासाठी कांगारू सज्ज झाले आहेत. दुसरीकडे मालिकेतले दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत, त्यामुळे मालिका गमावण्याचे दडपण त्यांच्यावर नसेल. हा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ नक्कीच उत्सुक असेल. हा सामना अनिर्णीत राहिला तरी भारताला मालिका जिंकता येईल, पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवाची ४-० अशी परतफेड मात्र करता येणार नाही. त्यामुळे फॉर्मात असलेला भारतीय संघ हा सामना जिंकण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असेल.
पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खेळपट्टी फिरकीला पोषक होती, पण येथील खेळपट्टी पहिले तीन दिवस फलंदाज आणि वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी ही भारतातली सर्वोत्तम खेळपट्टी समजली जात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मालिकेत विजयाची संधी या मैदानात जास्त मिळण्याची शक्यता आहे.
दोन्ही कसोटी सामने दिमाखात जिंकल्याने भारताचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. मुरली विजयने गेल्या सामन्यात शतक झळकावत संघातील जागा पक्की केली आहे, त्याचबरोबर गेल्या सामन्यात द्विशतक झळकावलेला चेतेश्वर पुजारा दुखापतीतून सावरला असून त्याच्याकडूनही कामगिरीत सातत्य राखण्याची अपेक्षा असेल. वीरेंद्र सेहवागला डच्चू दिल्यामुळे डावखुरा शिखर धवन या सामन्यात पदार्पण करेल. सचिन तेंडुलकरला अजूनही शतक झळकावता आले नसल्याने तो या सामन्यात शतकाची वेस ओलांडतो का, याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. महेंद्रसिंग धोनी चांगल्या फॉर्मात आहे, तर विराट कोहलीकडूनही धावा होत असल्या तरी त्यामध्ये सातत्य पाहायला मिळालेले नाही. रवींद्र जडेजा हा अष्टपैलू म्हणून संघात आला असला तरी त्यांच्याकडून चांगली गोलंदाजीच पाहायला मिळते आहे, फलंदाजीमध्ये मात्र त्याला अजूनही छाप पाडता आलेली नाही. आर. अश्विनने दोन्ही सामन्यांत चांगली गोलंदाजी केल्याने त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल. पहिल्या दोन्ही सामन्यांत हरभजन सिंगला लौकिकाला साजेशी गोलंदाजी करता आलेली नाही, त्यामुळे कदाचित त्याच्या जागी प्रग्यान ओझाला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण घरच्या मैदानाचा फायदा मिळेल, या विचाराने त्याला तिसऱ्या सामन्यात खेळवता येईल. इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार या मध्यमगती गोलंदाजांना खेळपट्टीची चांगली मदत मिळणार असल्याने त्यांच्या कामगिरीवर साऱ्यांचेच लक्ष असेल.
ऑस्ट्रेलियाच्या संघावर बंडाळीचे सावट नक्कीच असेल. कर्णधार मायकेल क्लार्कचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला सातत्यपूर्ण कामगिरीने आपली छाप पाडता आलेली नाही, त्यामुळेच त्याला फलंदाजीमध्ये बढती देण्यात येईल. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि इडी कोवन यांच्याकडून दमदार सुरुवातीची अपेक्षा असेल. ग्लेन मॅक्सवेल, मोइसेस हेन्रिक्स आणि झेव्हियर डोहर्टी या अष्टपैलूंकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत. यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिन मॅथ्यू वेडपेक्षा चांगली कामगिरी करून संघाला मदतीचा हात देतो का, याची उत्सुकता असेल. स्टिव्हन स्मिथचा यावेळी संघात समावेश होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
खेळाडूंच्या हकालपट्टीचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे योग्य आहे. संघातील छोटय़ा-छोटय़ा गोष्टीही काही महत्त्वाच्या असतात. या निर्णयाने प्रेक्षकांना वाईट वाटले असेल, पण या निर्णयाचा गांभीर्याने विचार केला तर तो योग्य असल्याचे जाणवेल. संघात शिस्त राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
– मिकी आर्थर, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक
पुजारा तंदुरुस्त; सामन्यात खेळणार – धवन
मोहाली : बुधवारी सराव करताना भारताचा युवा फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो या सामन्यात खेळणार की नाही आणि खेळणार नसेल तर अजिंक्य राहणेला संधी मिळणार का, अशी चर्चा रंगत होती. पण सलामीवीर शिखर धवनने पत्रकार परिषदेमध्ये पुजारा फिट असून तिसऱ्या सामन्यात खेळणार असल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला.
पुजाराला सरावादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती, पण तो आता पूर्णपणे फिट आहे आणि तिसऱ्या सामन्यात खेळणारही आहे, असे धवनने सांगितले.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, हरभजन सिंग, प्रग्यान ओझा, इशांत शर्मा, अशोक दिंडा आणि भुवनेश्वर कुमार.
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), इडी कोवन, डेव्हिड वॉर्नर, फिल ह्य़ुजेस, ग्लेन मॅक्सवेल, पीटर सिडल, नॅथल लिऑन, ब्रॅड हॅडिन, ग्लेन मॅक्सवेल, मोइसेस हेन्रिक्स, झेव्हियर डोहर्टी, स्टिव्हन स्मिथ.
सामन्याची वेळ : सकाळी ९.३० पासून.
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट वाहिनीवर.
जे काही घडले त्याचा विचार आता डोक्यात नाही. भविष्याचा सकारात्मक विचार करूनच आम्ही मैदानात उतरतो. खेळाडूंच्या हकालपट्टीचा संघावर काही प्रमाणात परिणाम होणार असला तरी आम्ही त्यामधून नक्कीच बाहेर पडू. संघातील युवा खेळाडूंमध्ये चांगलीच गुणवत्ता असून त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी असेल. शेन वॉटसनशी मी बोललो असून तो चौथ्या कसोटी सामन्यामध्ये खेळेल, अशी मला आशा आहे.
– मायकेल क्लार्क, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार.
आम्ही चालवू हा पुढे वारसा – धवन
गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी संघाला दर्जेदार सलामी दिली होती. त्यांचा हा वारसा आम्ही पुढे चावण्याचा नक्कीच प्रयत्न करु. त्यांच्याप्रमाणेच भविष्यामध्ये मी आणि विजय संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. विजयबरोबर मी इराणी करंडकामध्ये सलामी दिली होती, त्या वेळी आम्हाला कोणतीही तांत्रिक समस्या जाणवली नव्हती. स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी झाल्याने या सामन्यात खेळताना माझ्यावर कोणतेही दडपण नाही, असे भारताचा सलामीवीर शिखर धवन याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा