INDW vs ENGW Semifinal Highlights in Marathi: भारताच्या अंडर-१९ महिला संघाने मलेशियामध्ये खेळवल्या जात असलेल्या १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडवर ९ विकेट्सने मोठा विजय मिळवला. भारताच्या फिरकीपटू गोलंदाजांनी भारताच्या विजयाचा पाया रचला तर संघाच्या सलामीवीरांनी संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाच्या या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गट फेरीत अजेय राहिल्यानंतर भारताने उपांत्य फेरीत इंग्लिश फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. भारतीय गोलंदाजांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात कहर केला. भारतीय गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ २० षटकांत केवळ ११३ धावाच करू शकला. भारतीय संघाने ५ षटकं शिल्लक ठेवत ११७ धावा करत विजय मिळवला. भारतीय गोलंदाज या सामन्यात किती वरचढ होते याचा अंदाज विकेट्सवरून येतो. आठ पैकी सहा फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांनी क्लीन बोल्ड केलं तर दोन फलंदाज झेलबाद झाले.

इंग्लंडच्या महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामीवीरांनी हा निर्णय अगदी योग्य ठरवला. इंग्लंडची सलामीवीरांनी सुरूवातीला चौकार-षटकांराचा पाऊस पाडला. पण भारताची फिरकीपटू पारूनिका हिने गोलंदाजीला येताच भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. पारूनिका लागोपाठ दोन विकेट्स घेत इंग्लंडला धक्के दिले.

यानंतर परिन आणि नोग्रोव्ह चांगली भागीदारी रचत असताना आयुषी शुक्लाने परिनला क्लीन बोल्ड करत भारताला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. त्यानंतर इंग्लंडची कर्णधारही बाद झाली आणि इंग्लंडचा डाव यानंतर पत्त्यांसारखा कोसळला. वैष्णवी शर्माने १६ व्या षटकात ३ विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर टाकले. तर त्रिशानेही १ विकेट घेतली.

इंग्लंडने दिलेल्या ११४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेहमीप्रमाणे भारताच्या सलामी जोडीने चांगली सुरूवात करून दिली. मागील सामन्यातील शतकवीर गोंगाडी त्रिशा बाद झाल्याने भारताला धक्का बसला पण तिने २९ चेंडूत ५ चौकारांसह ३५ धावांची शानदार खेळी केली. तर यानंतर जी कमालिनीने अर्धशतक झळकावत संघाचा विजय निश्चित केला. कमालिनीने ५- चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ५६ धावा केल्या. तर सानिका चाळकेने ११ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indw beat engw by 9 wickets in semi final and enters final of u19 womens t20 world cup 2025 bdg