INDW vs MLYW U19 T20 WC Highlights In Marathi: १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने मलेशियाचा १० विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने अवघ्या १७ चेंडूत हा सामना जिंकला. मलेशियाचा संघ अवघ्या ३१ धावांत गारद झाला, त्यानंतर टीम इंडियाने २.५ षटकांत ३२ धावांचे लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी सलामीवीर जी त्रिशाने १२ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. भारताच्या या ऐतिहासिक विजयाची स्टार ठरली वैष्णवी शर्मा. जिने या सामन्यात हॅटट्रिक घेत ५ धावांमध्ये ४ विकेट्स दिले.
टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर मलेशियन संघाचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. पॉवरप्लेपर्यंत या संघाने ४ विकेट गमावल्या होत्या. जोशिताने मलेशियाला सुरुवातीचा धक्का दिला. यानंतर आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा या डावखुऱ्या फिरकीपटूंनी जणू धुमाकूळ घातला. आयुषी आणि वैष्णवीने मिळून १३ धावांत ८ विकेट घेतले. आयुषीने ८ धावा देत ३ फलंदाजांना माघारी धाडले आणि वैष्णवीने ५ धावा देत ५ विकेट घेतले. वैष्णवीचा हा पदार्पणाचा सामना होता आणि तिने हॅट्ट्रिकसह कारकिर्दीतील पहिले पाच विकेट घेत इतिहास घडवला.
वैष्णवी शर्मा व्यतिरिक्त आयुषी शुक्लाने ३ विकेट्स घेतले तर जोशिताने एक विकेट घेतली. भारताकडून फलंदाजी करताना गोंगडी त्रिशा आणि जी कमलिनी या सलामीच्या जोडीने एकही विकेट न गमावता आपल्या संघाला २.५ षटकांतच विजय मिळवून दिला. गोंगडी त्रिशाने १२ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने २७ धावांची तुफानी खेळी केली. त्याने २०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. तर कमलिनी ४ धावा करून नाबाद परतली.
टीम इंडियाने १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकात सलग दुसरा विजय नोंदवला आहे. भारताने वेस्ट इंडिजविरूद्ध पहिला सामना ९ विकेटने जिंकला होता. त्या सामन्यातही भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या ४४ धावांवर गारद झाला आणि त्यानंतर भारतीय संघाने अवघ्या ४.२ षटकांत लक्ष्य गाठले. या सामन्याची मॅचविनर खेळाडू जोशिता ठरली. जिने २ धावांत ५ विकेट घेतले होते.
आता भारतीय संघाला आपला पुढचा तिसरा सामना २३ जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. टीम इंडिया अ गटातून उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली आहे. श्रीलंकेचा संघही आधीच पात्र ठरला आहे. आता या दोघांमध्ये गटातील टॉपर होण्यासाठी स्पर्धा होणार आहे.