INDW vs SLW U1919 Women’s T20 World Cup 2025 Highlights in Marathi: १९ वर्षाखालील टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेच्या महिला संघाचा पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला आहे. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध केवळ ११८ धावा केल्या होत्या, पण तरीही त्यांना सहज विजय मिळाला. भारताने श्रीलंकेचा संघ अवघ्या ५८ धावांवर रोखला आणि ६० धावांनी आणखी एक मोठा विजय नोंदवला. टीम इंडिया अ गटात सलग तीन सामने जिंकून अव्वल स्थानावर राहिली आणि सुपर ६ लीग टप्प्यासाठी पात्र ठरली आहे. दुसरीकडे या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाने पहिलाच सामना गमावला आहे. हा संघही सुपर सिक्समध्ये पोहोचला आहे.
टीम इंडियाने अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकातील तिन्ही गट सामने जिंकले आहेत. वर हे तिन्ही सामने भारतीय संघाने एकतर्फी जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून पराभव केला होता. यानंतर मलेशियाचा संघ १० गडी राखून पराभूत झाला आणि आता श्रीलंकेवर ६० धावांनी मोठा विजय नोंदवला गेला आहे. गुणतालिकेत भारतीय संघ ३ सामन्यांत ६ गुणांसह उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे.
भारताच्या गोंगाडी त्रिशाची महत्त्वपूर्ण खेळी
श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय श्रीलंकेच्या पथ्यावरही पडला. कारण गोंगाडी त्रिशा वगळता भारताच्या कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. फक्त गोंगाडी त्रिशाच्या ४९ धावांच्या खेळीवर भारताने या सामन्यात मजबूत आघाडी मिळवली. त्रिशाने ५ चौकार आणि एक षटकार लगावला. तिच्या या खेळीमुळे टीम इंडियाने ११८ धावांपर्यंत मजल मारली. त्रिशाशिवाय एकाही फलंदाजाला २० धावांपर्यंत मजल मारता आली नाही. श्रीलंकेकडून लिमांसा तिलकरत्ने आणि प्रमुदी मथासराने २-२ विकेट घेतले.
भारताने विजयासाठी श्रीलंकेला अवघ्या ११९ धावांचे लक्ष्य दिले होते. पण भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेने पार गुडघे टेकले. शबनम शकील आणि जोशिता यांनी मिळून श्रीलंकेच्या टॉप ऑर्डरला सुरूंग लावला. शकील आणि जोशिता या दोघींनी २-२ विकेट घेतल्या. आयुषी शुक्लाला एक विकेट मिळाली.