भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान सध्या पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पार पडला. डीवाय पाटील स्टेडियमवर पार पडलेल्ला सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये भारताने ४ धावांनी विजय नोंदवला. या विजयात स्मृती मंधानाने महत्वाची भूमिका निभावली. त्याचबरोबर तिने एका विक्रमाला देखील गवसणी घातली आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाच्या २५०० धावा पूर्ण –
भारतीय महिला संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५०० हून अधिक धावा करणारी स्मृती मंधाना ही दुसरी महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या आधी हे विशेष पराक्रम फक्त हरमनप्रीत कौरच्या नावावर नोंदवला गेला होता. कौरने देशासाठी १३९ सामने खेळताना१२५ डावांत २७.३६ च्या सरासरीने २७३६ धावा केल्या. त्याचवेळी, मंधानाने तिच्या १०४ व्या सामन्यातील १०० व्या डावात ही विशेष कामगिरी केली आहे. मंधानाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५४४ धावा केल्या आहेत.
दुसऱ्या टी-२० सामन्यात तळपली मंधानाची बॅट –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात स्मृती मंधानाची बॅट जोरदार तळपली. संघासाठी डावाची सुरुवात करताना तिने ४९ चेंडूत १६१.२२ च्या स्ट्राईक रेटने ७९ धावांची मौल्यवान खेळी खेळली. यादरम्यान तिच्या बॅटमधून ९ चौकार आणि ४ उत्कृष्ट गगनचुंबी षटकार निघाले.
भारतीय महिला संघाचा विजय –
दुसऱ्या टी-२० सामन्यात पाहुणा संघ ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत १ गडी गमावून १८७ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघ निर्धारित षटकांत पाच गडी गमावून केवळ १८७ धावाच करू शकला. यानंतर सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमधून काढण्यात आला. सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने ४ धावांनी विजय नोंदवला.