Indian women’s team beat Bangladesh by 108 runs: भारत आणि बांगलादेशच्या महिला संघादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने १०८ धावांनी जिंकला. ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने आठ बाद २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ १२० धावांवर गारद झाला. या सामन्यात जेमिमाह जेमिमा रॉड्रिग्जने अष्टपैलू कामगिरी केली. तसेच भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाला १७ धावांवर पहिला धक्का प्रिया पुनियाच्या रूपाने बसला, जी केवळ ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर, ६८ धावांपर्यंत संघाने ३ विकेट गमावल्या. इथून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी मिळून डाव सांभाळला, पण हाताला वेदना होत असल्याने हरमनप्रीत दुखापतग्रस्त होऊन पॅव्हेलियनमध्ये परतली.
कर्णधार हरमनप्रीतने अर्धशतक झळकावले –
त्यानंतर जेमिमाने हरलीनसोबत डाव पुढे नेला आणि दोघींमध्ये ५५ धावांची भागीदारी पाहायला मिळाली. हरलीन २५ धावा करून बाद झाली, तर जेमिमाने ८६ (७८) धावांच्या खेळीत ९ चौकार लगावले. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर डावाच्या शेवटच्या षटकात फलंदाजीला आलेल्या कर्णधार हरमनप्रीतने आपले अर्धशतक (५२) पूर्ण करत धावसंख्या २२८ पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बांगलादेशकडून गोलंदाजीत सुलताना खातून आणि नाहिदा अख्तरने २-२ बळी घेतले.
हेही वाचा – IND vs WI: दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया आणि ब्रायन लाराची झाली भेट, पाहा VIDEO
जेमिमा आणि देविकाच्या फिरकीसमोर बांगलादेशचा संघ गारद –
२२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश महिला संघाची सुरुवात खूपच खराब झाली. ३८ धावांपर्यंत संघाने आपले ३ महत्त्वाच्या विकेट गमावल्या. यानंतर फरजाना हक आणि रितू मोनी यांच्यात चौथ्या विकेटसाठी ५० हून अधिक धावांची भागीदारी झाली. ही जोडी देविका वैद्यने फोडली आणि येथून सुरू झालेली विकेट्सची मालिका १२० धावांवर जाऊन थांबली. जेमिमा रॉड्रिग्जने ३.३ षटकात केवळ ३ धावा देत ३ बळी घेतले. तर देविका वैद्यने ८ षटकात ३० धावा देत ३ बळी घेतले. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील निर्णायक सामना २२ जुलै रोजी होणार आहे.