India Beat Bangladesh and Reached Women’s Asia Cup 2024 Finals: भारतीय संघाने महिला आशिया कप २०२४ च्या अंतिम फेरीत दमदार धडक मारली आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा १० गडी राखून पराभव केला. बांगलादेशने दाम्बुलाच्या मैदानावर ८१ धावांचे सोपे लक्ष्य भारतासमोर ठेवले होते, जे भारताने एकही विकेट न गमावता ११ षटकांत पूर्ण केले. बांगलादेशने २० षटकांत ८ गडी गमावून ८० धावा केल्या.

सलामीवीर स्मृती मानधनाने ३९ चेंडूत नऊ चौकार आणि एक षटकार लगावत नाबाद ५५ धावा केल्या. शेफाली वर्माने २८ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने २६ धावांची नाबाद खेळी करत भारताने सलग नवव्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने आतापर्यंत स्पर्धेतील जेतेपदाचे सर्व सामने खेळले आहेत. सात वेळा ट्रॉफी जिंकणारा भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची नजर आता आठव्या विजेतेपदावर असेल. अंतिम फेरीत भारताचा सामना कोणाशी होणार हे दुसऱ्या उपांत्य फेरीत यजमान श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर स्पष्ट होईल.

भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीत बांगलादेशने २० षटकांत ८ गडी गमावून फक्त ८० धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार निगार सुलतानाने सर्वाधिक धावा केल्या. तिने ५१ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने ३२ धावांची खेळी केली. शोर्ना अख्तरने १८ चेंडूत २ चौकारांसह १९ धावा करत नाबाद परतली. भारताकडून रेणुका ठाकूर सिंग आणि राधा यादव यांनी शानदार गोलंदाजी केली. रेणुकाने तिच्या चार षटकांत केवळ १० धावा दिल्या आणि ३ विकेट घेतल्या. तर राधाने १४ धावा देत ३ विकेट घेतले. पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात खूपच खराब झाली. रेणुकाने पहिल्याच षटकात दिलारा अख्तरला (६) बाद केले. यानंतर रेणुकाने तिसऱ्या आणि पाचव्या षटकात बांगलादेशने दोन विकेट्स गमावले. तर राधा यादवने २० व्या षटकात एकही धाव न देता २ विकेट्स घेतल्या. कर्णधार निगार आणि शोरना यांनी सातव्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी करत बांगलादेशला ८० धावांपर्यंत नेले. राधाने २०व्या षटकात निगार आणि नाहिदा अख्तरला बाद केले. बांगलादेशच्या रितू मोनी (५), राबेया खान (१), रुमाना अहमद (१), मुर्शिदा खातून (४) आणि इश्मा तंजीम (८) या सात खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही.

Live Updates

Women's Asia Cup 2024 1st Semifinal Highlights INDW vs BANW:महिला आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा १० विकेट्सने पराभव करत नवव्यांदा आशिया चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

16:28 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: स्मृती मानधनाचे अर्धशतक अन् टीम इंडिया फायनलमध्ये

स्मृती मानधनाने शानदार फलंदाजी करत ३९ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. स्मृतीने चौकारांची हॅटट्रिक लगावत भारताला शानदार विजय मिळवून दिला. रेणुका सिंग, राधा यादवची भेदक गोलंदाजी अन् स्मृती-शफालीच्या फटकेबाजीसह भारताने बांगलादेशविरूद्धच्या १० विकेट्सने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ नवव्यांदा आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

https://twitter.com/BCCIWomen/status/1816790794302554593

16:18 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: स्मृती झेलबाद अन् नो बॉल

आठव्या षटकातील जहानआराच्या पाचव्या चेंडूवर स्मृती झेलबाद झाली. पण तो नो बॉल असल्याचं स्मृतीला अंदाज आला आणि त्यामुळे ती क्रीझवरचं थांबली. तितक्यात पंचांनीही नो बॉल दिला. फ्री हिटवर स्मृतीने मोठा शॉट नाही मारू शकली. पण स्मृती आपल्या शानदार फॉर्मात कायम आहे. यासह ८ षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद ५८ धावा आहे.

16:06 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: पॉवरप्लेमध्ये भारताच्या ४६ धावा

भारताना पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ४६ धावा केल्या आहेत. शफाली आणि स्मृतीने वेळोवेळो फटकेबाजी करत सावध फलंदाजी केली आहे. यासह टीम इंडिया विजयापासून अवघ्या काही धावा दूर आहे.

16:00 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: भारत विजयाच्या जवळ

५ षटकांमध्ये भारताने बिनबाद ४५ धावा केल्या आहेत. स्मृती मानधनाने पाचव्या षटकात शानदार फलंदाजी करत १२ धावा केल्या. यासह आता टीम इंडियाला ९० चेंडूत ३७ धावांची गरज आहे.

15:48 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: २ षटकांनंतर भारताची धावसंख्या

स्मृती मानधनाने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत तिच्या इनिंगला शानदार सुरूवात केली. तर शफाली वर्माही तिच्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून तिला साथ देत आहे. दोन षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद १५ धावा केल्या आहेत.

15:41 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: भारताच्या डावाला सुरूवात

बांगलादेशने दिलेल्या ८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताचे सलामीवीर मैदानात उतरले आहेत. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधनाच्या जोडीने फलंदाजीला सुरूवात केली आहे. तर बांगलादेशकडून मारूफा पहिली गोलंदाज.

15:30 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: मेडन ओव्हरसह बांगलादेशने केल्या इतक्या धावा

बांगलादेशने २० षटकांत ८ बाद ८० धावा केल्या. रेणुका सिंग आणि राधा यादव यांच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या संघाने गुडघे टेकले. राधा आणि रेणुकाने प्रत्येकी ३ विकेट घेत भारताला सामन्यात कायम ठेवले. राधा यादवने २० षटकात एकही धाव न देता २ विकेट्स मिळवल्या. तर बांगलादेशकडून कर्णधार निगार सुलतानाने ५१ चेंडूत सर्वाधिक ३२ धावा केल्या. तर शोरना अख्तरने १९ धावा केल्या. यासह भारताला विजयासाठी १२० चेंडूत ८१ धावांची गरज आहे.

https://twitter.com/BCCIWomen/status/1816776632079909100

15:27 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: २०व्या षटकात राधा यादवने घेतल्या दोन विकेट

राधा यादवने २० षटकातील पहिल्याच चेंडूवर बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाला झेलबाद केले. तर तिसऱ्या चेंडूवर तिने नाहिदा अख्तरला क्लीन बोल्ड करत संघाला ८वी विकेट मिळवून दिली. राधाने जबरदस्त गोलंदाजी करत २० व्या षटकात एकही धाव न देता डबल विकेट मेडन ओव्हर टाकली.

15:24 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: १९ व्या षटकात बांगलादेशने केल्या धावा

बांगलादेशने १९ व्या षटकात चांगल्या धावा केल्या. पूजा वस्त्राकरच्या १९व्या षटकात एका नो बॉलसह दोन चौकार लगावले. यासह १३ धावा १९व्या षटकात संघाने केल्या. यासह बांगलादेशने १९ षटकांत ६ बाद ८० धावा केल्या.

15:13 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: बांगलादेशतच्या ५० धावा पूर्ण

बांगलादेशने १६व्या षटकात आपल्या ५० धावा पूर्ण केल्या. बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना ४४ चेंडूत २३ धावा तर ५ चेंडूत १ धावा करत मैदानात कायम आहे. १६ षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या ६ बाद ५२ धावा आहे.

https://twitter.com/BCCIWomen/status/1816771488193872043

15:07 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: ऋचा घोषची जबरदस्त स्टंपिंग

१४व्या षटकातील दीप्ती शर्माच्या तिसऱ्या चेंडूवर ऋचा घोषने जबरदस्त स्टंपिंग करत भारताला सहावी विकेट मिळवून दिली. ऋचाच्या चपळतेपुढे रितु मोनी ५ धावा करत आऊट झाली. यासह १४ षटकांत बांगलादेशने ६ बाद ४४ धावा केल्या आहेत.

14:58 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत

११ व्या षटकातील पूजा वस्त्राकरच्या पाचव्या राबेया खान ७ चेंडूत १ धाव करत शफालीकडून झेलबाद झाली. यासह बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. ११ षटकांत बांगलादेशचा संघ केवळ ३३ धावा करू शकला आहे. तर गेल्या ७ षटकांमध्ये बांगलादेशला एकही बाऊंड्री लगावता आलेली नाही.

14:48 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: राधा यादवची भेदक गोलंदाजी

राधा यादव सेमीफायनल सामन्यातील तिच्या पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली आहे. राधाने १० व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रूमाना अहमदला क्लीन बोल्ड करत संघाला चौथी विकेट मिळवून दिली आहे. रूमाना ११ चेंडूत १ धाव करत बाद झाली. यासह १० षटकांनंतर बांगलादेशने ४ बाद ३२ धावा केल्या आहेत.

14:40 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: पॉवरप्लेमध्ये बांगलादेशने गमावल्या ३ विकेट

बांगलादेशने पॉवरप्लेमध्ये ३ बाद २५ धावा केल्या आहेत. रेणुका सिंगच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचे सलामीवीर झटपट बाद झाले. तर इश्मा तंजीमही तिच्या गोलंदाजीवर बाद झाली. दिलारा अख्तर ६, मुर्शिदा खान ४ धावा, तर इश्मा ८ धावा करत झेलबाद झाली. रेणुका ३ मोठ्या विकेट मिळवत बांगलादेशला बॅकफूटवर आणले.

14:33 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: रेणुकाच्या ५० विकेट

रेणुका सिंगने तिच्या स्पेलमधील सलग तीन षटकांत तीन विकेट मिळवल्या आहेत. रेणुकाने भेदक गोलंदाजी करत बांगलादेश संघाला तीन मोठे धक्के दिले आहेत. या तीन विकेटसह रेणुका सिंगने टी-२० मधील ५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

https://twitter.com/BCCIWomen/status/1816759759166722123

14:31 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: रेणुकाच्या तीन विकेट पूर्ण

रेणुकाने तिच्या स्पेलमधील पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर मुर्शिदा खातूनला शफाली वर्माकडून झेलबाद करत संघाला तिसरी विकेट मिळवून दिली. यासह रेणुकाने सेमीफायनल सामन्यात ३ विकेट्स पूर्ण केल्या आहेत. ५ षटकांनंतर बांगलादेश ३ बाद २१ धावा.

14:23 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: रेणुकाच्या खात्यात दुसरी विकेट

रेणुका सिंगने तिच्या पुढच्याच तिसऱ्या षटकात भारताला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर इश्माने बॅट पुढे घेताच चेंडू बॅटच्या कडेला लागत हवेत गेला. शॉर्ट थर्ड मॅनवर उभ्या असलेल्या तनुजा कन्वरने शानदार हवेत उडी घेत शानदार झेल टिपला. यासह ३ षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या २ बाद १७ धावा.

https://twitter.com/BCCIWomen/status/1816758546186535018

14:11 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: पहिल्याच षटकात विकेट

दिलारा अख्तरने पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर दणदणीत षटकार लगावला. पण पुढच्याच चेंडूवर रेणुका सिंगने तिला थेट पॅव्हेलियनमध्ये धाडले. दिलारा चौथ्या चेंडूवरही मोठी फटका मारायला गेली आणि सीमारेषेजवळ झेलबाद झाली. यासह बांगलादेशची धावसंख्या १ षटकानंतर १ बाद ७ धावा

https://twitter.com/BCCIWomen/status/1816755595078459738

14:08 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: पहिल्या षटकात षटकार....

भारताकडून रेणुका सिंगने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. पहिले दोन चेंडूनंतर तिसऱ्या चेंडूवर दिलारा अख्तरने दणदणीत षटकार लगावला. बांगलादेशच्या खेम्यात एकच आनंदाची लहर उमटली. या षटकारासह बांगलादेशने तीन चेंडूत ७ धावा केल्या.

14:04 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: भारताच्या गोलंदाजीला सुरूवात

बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरली आहे. मुर्शिदा खातून आणि दिलारा अख्तर मैदानात आहेत. तर भारताकडून रेणूका सिंगने गोलंदाजीला सुरूवात केली आहे.

14:02 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानात

आशिया कप २०२४ मधील उपांत्य सामन्यापूर्वी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात पोहोचले. प्रथम भारताचे राष्ट्रगीत आणि नंतर बांगलादेशचे राष्ट्रगीत म्हणत सामन्याला सुरूवात झाली आहे.

13:48 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: भारताची प्लेईंग इलेव्हन

शेफाली वर्मा, स्मृती मानधना, उमा छेत्री, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग.

13:47 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: बांगलादेशची प्लेईंग इलेव्हन

दिलारा अख्तर, मुर्शिदा खातून, निगार सुलताना (यष्टीरक्षक/कर्णधार), रुमाना अहमद, इश्मा तंजीम, रितू मोनी, राबेया खान, शोर्ना अख्तर, नाहिदा अख्तर, जहाँआरा आलम, मारुफा अख्तर.

13:41 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: बांगलादेशने नाणेफेक जिंकली

बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर विश्रांतीनंतर या सामन्यात खेळण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. हरमन कर्णधार असेल तर स्मृती संघाची उपकर्णधार असेल.

13:25 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: हरमनप्रीत कौर कर्णधार

आशिया कप २०२४ मधील भारताच्या गट टप्प्यातील अखेरच्या सामन्यात भारताची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हिला विश्रांती देण्यात आली होती. पण आता उपांत्य सामन्यात हरमनप्रीत कौर पुन्हा कर्णधार म्हणून खेळेल. तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल.

13:23 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: लाइव्ह टेलिकास्ट

भारत वि बांगलादेशमधील उपांत्य सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट मोबाईलवर हॉटस्टारवर पाहू शकता आणि स्टार स्पोर्ट्सवरही पाहता येईल.

13:21 (IST) 26 Jul 2024
INDW vs BANW Live Score: हेड टू हेड

भारत आणि बांगलादेशच्या संघांमध्ये आतापर्यंत एकूण २२ टी-२० सामने खेळवले गेले आहेत. ज्यापैकी टीम इंडियाने एकूण १९ सामने जिंकून वर्चस्व राखले आहे. तर बांगलादेशला केवळ ३ सामने जिंकता आले आहेत.

13:19 (IST) 26 Jul 2024
टीम इंडियाची विजयी घोडदौड

महिला आशिया कप २०२४ मध्ये आतापर्यंत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाला कोणताच संघ पराभूत करू शकला नाही. गट सामन्यातील तिन्ही सामने जिंकत भारताने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

Women's Asia Cup 2024, India vs Bangladesh Highlights: महिला आशिया कप २०२४ मध्ये भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव करत नवव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.

Story img Loader