IndiaW vs EnglandW T20 World Cup Match Today, 18 February 2023: दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला टी२० विश्वचषकात शनिवारी (१८ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड सामना संपन्न झाला. इंग्लंडने टीम इंडियाचा ११ धावांनी पराभव करत गुणतालिकेत पहिले स्थान अबाधित राखले आहे. धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधनाने झुंजार अर्धशतक केले मात्र ते भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. रिचा घोषची शेवटच्या षटकातील फटकेबाजी देखील टीम इंडियाला पराभवापासून वाचवू शकली नाही. तिन्ही सामन्यात ती नाबाद राहिली.
इंग्लंडने ठेवलेल्या १५२ धावांचा पाठलाग करताना भारताने सावध सुरुवात केली. सलामीवीर शफाली वर्मा ८ धावा करून बाद झाली. मात्र स्मृती मंधनाने ४१ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरला मोठी खेळी करता आली नाही तिचा खराब फॉर्म अजूनही सुरूच असून तिच्यावर खूप टीका होताना दिसत आहे, ती अवघ्या ४ धावांत बाद झाली. पाकिस्तानविरुद्धची सामनावीर जेमिमाह रॉड्रिग्स केवळ १३ धावा करून बाद झाली. प्रत्येक सामन्यात उत्तम फिनिशरचे काम करणारी रिचा घोषने यासामन्यात देखील ४७ धावा केल्या. परंतु दुसऱ्या बाजूला तिला साथ देण्यासाठी कोणीही नव्हते, भारत केवळ १४० धावाच करू शकला. सारा ग्लेनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या रेणुका सिंग ठाकूर हिने शानदार गोलंदाजी करत पाच विकेट्स आपल्या नावे केले. यासोबतच तिने एक विक्रमही आपल्या नावे केला. पहिल्या दोन सामन्यात रेणुकाला फारशी चांगली गोलंदाजी करता आली नव्हती. मात्र, या सामन्यात तिने ते अपयश भरून काढले. तिने पहिल्याच षटकात डॅनी वॅटला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर सोफी डंकली व एलिस कॅप्सी यांना बाद करत तिने इंग्लंड संघाला संकटात टाकले. त्यानंतर डावातील अखेरचे षटक टाकण्यासाठी आल्यानंतर तिने एमी जोन्स व कॅथरीन सिव्हर ब्रंट हिला बाद करत आपले पाच बळी पूर्ण केले. आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये तिने १५ धावा दिल्या.
भारतीय महिला संघाकडून टी२० क्रिकेटमध्ये केलेली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी झुलन गोस्वामीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केवळ ११ धावांमध्ये पाच फलंदाजांना बाद केलेले. तसेच, इंग्लंडविरुद्ध टी२० विश्वचषकात कोणत्याही देशाच्या गोलंदाजांनी केलेली ही सर्वात्कृष्ट आकडेवारी ठरली. इंग्लंडच्या डाव्याचा विचार केल्यास तीन प्रमुख फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर नॅट सिव्हरने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तिने आक्रमक अर्धशतक झळकावले. तर, कर्णधार हिदर नाईटने २८ व एमी जोन्सने ४० धावांचे योगदान दिले. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट उपांत्य फेरीत आपली जागा पक्की करेल.
टीम इंडियाची नजर या स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयावर होती मात्र भारताच्या पदरी निराशा आली. हरमनप्रीतच्या संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. भारत तीन सामन्यांत चार गुणांसह गटात दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडनेही तीन सामन्यांत तीन विजय मिळवत ग्रुपमध्ये पहिले स्थान कायम राखले असून त्यांचा चांगला रनरेट देखील आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या इंग्लंडविरुद्ध भारत विजयी होऊ शकत नाही. भारताला आता २० फेब्रुवारी होणारा सामना जिंकणे आवश्यक आहे तरच टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहचू शकेन.