भारतीय महिला क्रिकेट संघांची कर्णधार मिताली राजने काही दिवसांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तिच्या निवृत्तीनंतर भारतीय महिला संघ पहिल्याच आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी श्रीलंकेला गेला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय मुलींनी आपल्या श्रीलंका मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या टी २० सामन्यात यजमान श्रीलंकेचा ३४ धावांनी पराभव केला. या विजयासह तीन टी २० सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. शेफाली वर्माने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. मात्र, श्रीलंकेच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे भारताला जास्त धावा करता आल्या नाहीत. डावाच्या तिसऱ्या षटकात सलामीवीर स्मृती मानधना अवघी एक धाव करून बाद झाली. तिच्या पाठोपाठ मेघनादेखील लवकर बाद झाली. उष्ण आणि दमट वातावरणात सुरुवातीलाच दोन विकेट्स गमावल्यानंतर भारतीय संघावर दबाव स्पष्टपणे दिसत होता. हरमनप्रीत आणि शेफाली वर्मा या जोडीने ही नाजूक परिस्थिती हाताळली. शेफालीने ३१ धावांची खेळी केली.
संघात पुनरागमन करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जने भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्याची जबाबदारी पार पाडली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेमिमाने तीन चौकार आणि एका षटकारासह ३६ धावा केल्या. निर्धारित २० षटकांमध्ये भारताने सहा बाद १३८ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २० षटकांत पाच गडी गमावून १०४ धावांपर्यंत मजल मारू शकला. भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने श्रीलंकेचे बळी मिळवल्याने त्यांना लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला नाही. शेफाली वर्माने दोन षटकांत १० धावा देऊन दोन बळी घेतले. तर, राधा यादवने दोन आणि पूजा वस्त्रारकर व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. ३६ धावांची खेळी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.