भारतीय महिला क्रिकेट संघांची कर्णधार मिताली राजने काही दिवसांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तिच्या निवृत्तीनंतर भारतीय महिला संघ आपला पहिला आंतरराष्ट्रीय दौरा करण्यास सज्ज झाला आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला संघ श्रीलंकेत दाखल झाला. हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर तिन्ही प्रकारच्या संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तिच्या नेतृत्त्वाखाली भारतीय मुली उद्यापासून (२३ जून) आपली श्रीलंका मोहिम सुरू करणार आहेत. मात्र, तीन टी २० आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश असलेल्या या दौऱ्याला अद्यापपर्यंत प्रसारकच मिळालेला नाही.
उद्या होणाऱ्या पहिल्या टी २० सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना यांच्याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. हरमनप्रीतने १२१ टी २० सामन्यांमध्ये दोन हजार ३१९ धावा केलेल्या आहेत. क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारामध्ये मितालीला मागे टाकण्यासाठी तिला फक्त ४६ धावांची गरज आहे. तर, स्मृती मंधानाला टी २० क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त २९ धावांची गरज आहे. तिने जर दोन हजार धावा पूर्ण केल्या तर अशी कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय महिला ठरू शकते.
हेही वाचा – मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ग्राउंड्समन होणार मालामाल! प्रत्येकी मिळणार एक लाख रुपये
बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या महिलांच्या टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, आयसीसी महिला टी २० विश्वचषक स्पर्धेलाही केवळ आठ महिने बाकी आहेत. अशा स्थितीत भारतीय संघाला आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात करावी लागणार आहे. महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय महिला संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे.
भारत आणि श्रीलंकेदरम्यानची टी २० मालिका सुरू होण्यासाठी २४ तासांपेक्षाही कमी कालावधीत शिल्लक आहे. असे असताना हे सामने भारतात प्रसारित होणार की नाही याची अद्याप काहीही माहिती नाही. कोणत्याही प्रसारकाने हे सामने डिजिटल प्लॅटफॉर्मवर किंवा दूरदर्शनवर प्रसारित करण्याचे अधिकार घेतलेले नाहीत.
इनसाइडस्पोर्टमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅशले डिसिल्वा यांनी याला प्रसारकांच्या समस्येला दुजोरा दिला आहे. “कोणत्याही प्रसारकाने या मालिकेचे हक्क घेतलेले नाहीत. त्यामुळे आम्ही आमच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर सामने थेट प्रसारित करण्यासाठी खटाटोप करत आहोत,” असे ते म्हणाले आहेत.