|| प्रशांत केणी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत २-३ अशा फरकाने पराभव पत्करल्यामुळे भारतीय संघ, व्यवस्थापन आणि निवड समितीला खडाडून जाग आणली आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास उपलब्ध असलेल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यापर्यंत फक्त प्रयोगच केले गेले. त्यामुळे संघनिवडीबाबतच्या प्रयोगाचे निष्कर्ष मिळू शकले नाहीत. या पाश्र्वभूमीवर काही माजी क्रिकेटपटू-प्रशिक्षकांनी मांडलेली त्यांची परखड मते –
रहाणेला संघाबाहेर का ठेवले? – दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी कर्णधार
इंग्लंडमधील विश्वचषकाचा विचार करता रहाणेला वर्षभर एकदिवसीय संघातून बाहेर का ठेवले, हे संशयास्पद वाटते. ५० षटके जो मैदानावर टिकेल आणि धावासुद्धा करेल अशा एका खेळाडूची आपल्याला गरज आहे. प्रत्येक वेळी विराट कोहली संघाला तारू शकणार नाही. आपल्या निवड समितीचा अनुभव खूपच तोकडा पडतो. कारण यापैकी एकही सदस्य इंग्लंडमध्ये खेळलेला नाही. ऑस्ट्रेलियाच्या नवख्या संघाने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मिळवलेल्या यशातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथच्या अनुपस्थितीत त्यांची दुसरी किती भक्कम आहे, हेच त्यांनी सिद्ध केले. ऑस्ट्रेलियामधील देशांतर्गत क्रिकेट हे भारतापेक्षा अधिक सक्षम आहे. तिथे प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तावूनसुलाखून खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज होतो. याशिवाय ते उसळणाऱ्या खेळपट्टय़ांवर खेळतात. त्यामुळे तेथील वातावरणात एखादा खेळाडू खेळू शकेल का, हा विचार करताना निवड समितीचा कस लागतो. ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमी ही उच्च कामगिरीला प्रेरक अकादमी आहे. दुर्दैवाने आपली राष्ट्रीय क्रिकेट अकादमी हे खेळाडूंचे पुनर्वसन करणारे रुग्णालय झाले आहे. या अकादमीने गेल्या काही वर्षांत खेळाडूच घडवलेले नाहीत. कारण तशी प्रक्रियाच अस्तित्वात नाही. भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, विजय शंकर, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक, उमेश यादव किंवा रवींद्र जडेजा.
आता नवे पर्याय जोखमीचे ठरतील! -चंद्रकांत पंडित, माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारतीय संघ जिंकण्याच्या उद्देशानेच खेळला. परंतु विश्वचषकाला सामोरे जाताना काही स्थानांचे बदल भारताला कसे फायदेशीर ठरतील, याचा अंदाज घेतला गेला. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेच्या तयारीची चाचपणी या मालिकेत झाली, असे मी म्हणेन. भारताची संघरचना तयार आहे, हे स्पष्ट दिसते. परंतु दुसरा यष्टीरक्षक, फलंदाजीचे चौथे स्थान आणि अष्टपैलू खेळाडूच्या पर्यायांपैकी निश्चिती झालेली नाही.
भारत-अ, युवा (१९ वर्षांखालील) संघाचे बरेच सामने होतात. त्यामुळे देशांतर्गत सामन्यांमध्ये चमकणाऱ्या खेळाडूंना योग्य संधी मिळत असते. त्यांच्यावर निवड समितीचे दुर्लक्ष होत आहे, असे मला वाटत नाही. विश्वचषकाच्या दृष्टीने नव्या पर्यायांची जोखीम निवड समिती पत्करत नाही. कारण या व्यासपीठावर खेळण्यासाठी पुरेसा अनुभव लागतो.
भारतीय संघ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील संघात फार बदलाला संधी नाही. परंतु यष्टीरक्षणासाठी धोनीसह कार्तिक किंवा वृद्धिमान साहाला स्थान द्यायला हवे. कारण पंत अतिशय नवखा ठरेल.
धोनीला पर्याय कार्तिकचा! – सुलक्षण कुलकर्णी, माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
भारतीय संघरचनेचे सातत्याने प्रयोगच सुरू होते. अजून बराच अवधी आहे, हेच शास्त्री, प्रसाद आणि कोहली म्हणत आले आहेत. मग उर्वरित सामन्यांची संख्या कमी करता करता ऑस्ट्रेलियाविरुद्धची अखेरची मालिका संपली. हा शेवट धक्कादायक ठरला. भारतीय संघ मायदेशात पराभूत झाला. ऑस्ट्रेलियासारख्या संघाला आपण आरामात हरवू, हा अतिआत्मविश्वास फोल ठरला. भारताची निवड प्रक्रिया अपयशी ठरल्याचेच यातून सिद्ध होते. धोनीला संपूर्ण मालिका खेळवण्याची नितांत आवश्यकता होती. तो असता तर एक सामना तो नक्की वाचवू शकला असता. ऋषभ पंतने यष्टीरक्षणात घोर निराशा केली. पंत हा मँचेस्टर युनायटेडचा गोलरक्षकच आहे. पंतला बरीच संधी दिली आणि टीकासुद्धा झाली. त्या दिवशी सामन्याप्रसंगी चाहत्यांनी धोनीचाच पुकार केला. दुर्दैवाने भारताकडे निवृत्तीच्या उंबरठय़ावरील धोनी हा एकमेव विजयवीर आहे. केदार जाधव हा क्वचित सामना वाचवू शकतो. धोनीला पर्याय हा कार्तिक ठरू शकतो. चौथ्या क्रमांकाचा शोध अखेपर्यंत संपला नाही. वर्षभर अंबाती रायुडू, धोनी, मनीष पांडे, जाधव, राहुल, कार्तिक, पंत हे खेळाडू आजमावले. पण निश्चित खेळाडूच सापडला नाही. इंग्लिश वातावरणासाठी अनुकूल तंत्र असणारा अजिंक्य रहाणे तिसरा सलामीवीर म्हणून भारतीय संघात असायला हवा. परंतु संघव्यवस्थापनाचे राहुलप्रेम अधिक आहे. रहाणे हा खरा सलामीवीर होता, परंतु संघव्यवस्थापनाने त्याला मधल्या फळीतील फलंदाज केले आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, अंबाती रायुडू, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार.
प्रश्न आणि पर्याय
- अंबाती रायुडू चौथ्या स्थानाला न्याय देण्यात अपयशी ठरत आहे.
- सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यात सातत्याचा अभाव आहे.
- तिसरा सलामीवीर म्हणून लोकेश राहुलला स्थान मिळू शकते.
- अजिंक्य रहाणे इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
- संघातील चौथा वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिक पंडय़ा किंवा विजय शंकर यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंवर भिस्त ठेवावी लागणार आहे.
- दुसरा यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतकडे आशेने पाहिले जात असले तरी त्याची सध्याची कामगिरी आणि अनुभव पाहता दिनेश कार्तिकला प्राधान्य मिळू शकते.
- कुलदीप यादव आणि यजुर्वेद्र चहल यांच्यासह अष्टपैलू रवींद्र जडेजाचा फिरकीचा पर्याय संघात स्थान मिळवू शकतो.