जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला ब्रिटनचा अँडी मरे याने फ्रेंच खुल्या स्पर्धेतून माघार घेण्याचे ठरवले आहे. डॉक्टरांशी सल्लामसलत करून मरेने फ्रेंच खुल्या स्पर्धेत न खेळण्याचे ठरवले असून, तो दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यावर विम्ब्लडनच्या तयारीसाठी लागणार आहे.
पॅरिसमध्ये खेळायला मला नेमीच आवडते, त्यामुळेच माझ्यासाठी हा निर्णय घेणे अवघड होता. डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यावर त्यांनी मला पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे सांगितले आणि त्यामुळेच मला फ्रेंच खुल्या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे मरेने सांगितले.
गेल्या आठवडय़ात झालेल्या रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यात पाठीचे दुखणे बळावले होते आणि त्यामुळेच त्याला स्पर्धा सोडावी लागली होती. या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला नसल्याने त्याने फ्रेंच खुल्या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.