आशिया चषक २०२२ क्रिकेट स्पर्धा तोंडावर येऊन ठेपलेली असताना पाकिस्ताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर पडला आहे. गाले येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना शाहीनच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. नव्याने केलेल्या स्कॅन आणि वैद्यकीय तपासणी अहवालांच्या आधारे त्याला चार ते सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला मिळाला आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) मुख्य वैद्यकीय अधिकारी, डॉ नजीबुल्लाह सूमरो यांनी शाहीनच्या दुखापतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “मी शाहीनशी बोललो आहे. स्वत:च्या स्थितीमुळे तो अस्वस्थ झाला आहे. पीसीबीचा क्रीडा आणि औषध विभाग येत्या काही आठवड्यांत त्याच्यावर जवळून लक्ष ठेवेल. पण, मला खात्री आहे तो जोरदार पुनरागमन करेल. तो ऑक्टोबरमध्ये स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याची शक्यता आहे.”

गेल्या वर्षी टी २० विश्वचषकात भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात शाहीनने जबरदस्त कामगिरी केली होती. भारताचा धावफलक सहा धावांवर जाऊपर्यंत त्याने रोहित आणि केएल राहुल या दोघांना बाद केले होते. त्यानंतर त्याने विराट कोहलीलाही बाद केले होते. त्याच्या मदतीनेच पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाचा भारताचा पराभव केला होता.

शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीमुळे पाकिस्तानचा संघ संकटात आला आहे. तो संघात नसल्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजी कमकुवत झाली आहे. दुसरीकडे, शाहीन आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर पडल्याची बातमी मिळताच भारतीय क्रिकेट चाहत्यांनी पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर याबाबत मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत.

Story img Loader