दुखापतग्रस्त सलामीवीर फलंदाज रोहित शर्माबाबत कोणतीही जोखीम न पत्करण्याचा निर्णय भारतीय संघव्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याला रोहित मुकणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात रोहितने १३८ धावांची खेळी साकारली होती. त्या सामन्यात रोहितच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ तिरंगी क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीत पोहोचला तरी रोहितची खेळण्याची शक्यता नाही. तो दुखापतीतून सावरत असल्यामुळे त्याच्याबाबत कोणतीही जोखीम न पत्करण्याचा निर्णय संघव्यवस्थापनाने घेतला आहे, कारण विश्वचषक सुरू होण्यासाठी आता तीन आठवडय़ांचा अवधी बाकी आहे.
रोहितच्या चाचणीअंतर्गत त्याला आठवडय़ाची विश्रांती घेणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याला सरावाला सुरुवात करता येईल. शिखर धवनला अद्याप सूर गवसलेला नाही. त्यामुळे रोहित तरी उपलब्ध राहावा, त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती दिली गेल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संघ ८ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाशी आणि १० फेब्रुवारीला अफगाणिस्तानशी विश्वचषक सराव सामने खेळणार आहे. याच सामन्यांमध्ये रोहितच्या तंदुरुस्तीची खात्री पटू शकेल.

Story img Loader