पीटीआय, नवी दिल्ली
आगामी ‘एएफसी’ आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी शनिवारी भारताच्या २६ सदस्यीय पुरुष संघाची घोषणा करण्यात आली. संघनिवडीवर खेळाडूंच्या दुखापतींचा फार मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. भरवशाचे मध्यरक्षक जिक्सन सिंग आणि ग्लॅन मार्टिन्स यांना दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळता येणार नाही. तर स्पर्धेपर्यंत तंदुरुस्त होईल असे गृहीत धरून सहल अब्दुल समदचा संघात समावेश करण्यात आला आहे.
जिक्सन नोव्हेंबर महिन्यापासून खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. मार्टिन्स अलीकडेच जायबंदी झाली आहे. यानंतरही दोघांचा संभाव्य ५० जणांत समावेश करण्यात आला होता. मात्र, अंतिम संघात त्यांना स्थान मिळाले नाही. समद तंदुरुस्त होईल असा अंदाज बांधून त्याच्या समावेश करण्यात आला आहे. मुख्य प्रशिक्षक इगॉर स्टिमॅच यांनीच संघाची घोषणा केली.
हेही वाचा >>>कुस्तीपटू विनेश फोगटने खेलरत्न, अर्जुन पुरस्कारांना कर्तव्यपथावर सोडलं; बजरंग पुनियानंतर मोठं पाऊल
आशियाई चषकासाठी भारतीय संघाचा ब-गटात समावेश असून, सलग पाचव्यांदा ते या स्पर्धेत खेळणार आहेत. भारताचा पहिला सामना १३ जानेवारील ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्यानंतर १८ जानेवारीला भारताची लढत उझबेकिस्तानशी होईल. या दोन्ही लढत अल रायान येथील अहमद बिन अली स्टेडियमवर होतील. त्यानंतर अल खोर येथे २३ जानेवारीस भारताचा सामना सीरियाशी होईल.
भारतीय संघ सरावासाठी शनिवारीच दोहा येथे दाखल झाला आहे. स्पर्धेला सुरुवात करण्यापूर्वी बचाव, चेंडूवरील नियंत्रण आणि मुख्यत्वे गोलकक्षाच्या बाहेरील खेळावर आम्हाला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे स्टिमॅच यांनी सांगितले. आमचे तीनही प्रतिस्पर्धी तगडे आहेत. तांत्रिक आघाडी आणि वेगवान खेळ ही त्यांची बलस्थाने आहेत. मुख्य म्हणजे त्यांचे खेळाडू शारीरिकदृष्टय़ा मजबूत आहेत. त्यामुळे आमची कसोटी लागेल. मात्र, आम्ही आमच्या खेळण्याच्या शैलीत फार बदल करणार नाही, असेही स्टिमॅच यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>IND vs SA : केपटाऊन कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, सराव सत्रात ‘या’ खेळाडूला फलंदाजी करताना झाली दुखापत
’ गोलरक्षक : अमिरदर सिंग, गुरप्रीत सिंग संधू, विशाल कैथ.
’ बचावपटू : आकाश मिश्रा, लालचुंगनुंगा, मेहताब सिंग, निखिल पुजारी, प्रीतम कोटल, राहुल भेके, संदेश झिंगन, सुभाशीष बोस.
’ मध्यरक्षक : अनिरुद्ध थापा, ब्रँडन फर्नाडिस, दीपक टांगरी, लालेंगमाविया राल्टे, लिस्टन कोलाको, नौरेम महेश सिंह, सहल अब्दुल समद, सुरेश सिंह वांगजाम, उदांता सिंह.
’ आक्रमक : इशान पंडिता, लल्लियांझुआला चांगटे, मनवीर सिंग, राहुल केपी, सुनील छेत्री, विक्रम प्रताप सिंह.