चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गाठ ऑस्ट्रेलियाशी
खेळाडूंच्या दुखापतीची समस्याच भारतासाठी शनिवारी मेलबर्नमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत त्रासदायक ठरणार आहे. या लढतीत भारताची ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे.
भारताचा कर्णधार सरदारा सिंग व मध्यरक्षक मनप्रित सिंग हे दोन्ही अनुभवी खेळाडू या लढतीत दुखापतीसह खेळणार आहेत. भारताच्या दृष्टीने ही लढत महत्त्वाची असल्यामुळे या दोन्ही खेळाडूंचा सहभाग आवश्यक झाला आहे.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सलग चार वेळा विजेतेपद मिळविले आहे. पाचव्या विजेतेपदासाठी ते उत्सुक असून घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा त्यांना मिळणार आहे. मात्र यंदा आतापर्यंत त्यांचा खेळ त्यांच्या नावलौकिकाला साजेसा झालेला नाही. त्यांना आतापर्यंत निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले आहे. त्यांनी इंग्लंडवर २-० असा शानदार विजय मिळविला आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचे खेळाडू दांडगाईचा खेळ करण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनेच भारताने गृहपाठ केला आहे. त्यांनी बेल्जियमवर १-० असा विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली आहे.
भारताचे प्रशिक्षक मायकेल नॉब्ज म्हणाले,‘‘आमच्या बचाव फळीतील खेळाडूंनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मात्र आघाडी फळीतील खेळाडूंकडून आम्हास अजूनही अव्वल दर्जाच्या खेळाची आवश्यकता आहे. ऑलिम्पिक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीच्या तुलनेत येथे आमच्या खेळाडूंनी खरोखरीच कौतुकास्पद खेळ केला आहे. उपांत्य फेरीपर्यतची मजल ही आश्चर्यजनकच कामगिरी आहे. आमच्या खेळाडूंच्या दुखापती ही माझ्यासाठी क्लेषकारक गोष्ट असली तरी संघातील उर्वरित खेळाडू या खेळाडूंची कसर भरुन काढतील अशी मला आशा आहे.’’