क्रिकेट या खेळात शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही होऊ शकतं, असे म्हटलं जातं. या वाक्याचा प्रत्यय अनेकदा क्रिकेट सामन्यात पाहायला मिळाला आहे. कधी कधी सामन्यात अशा काही घटना घडतात, ज्यावर विश्वास ठेवणंही अवघड होऊन जातं. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये महिलांचे देशांतर्गत क्रिकेट सामने सुरु आहेत. या स्पर्धेच्या एका सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये एक, दोन, तीन नाही तर तब्बल पाच विकेट पडल्या. यामुळे सहजरित्या जिंकता येणारा सामना फलंदाजी करणाऱ्या संघाला गमवावा लागला. ऑस्ट्रेलियामध्ये महिला राष्ट्रीय क्रिकेक लीग २०२२-२३ च्या अंतिम सामन्यात (WNCL final) दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाला तस्मानिया महिला संघाकडून केवळ एका धावेने पराभवाचा सामना करावा लागला. तस्मानिया संघाला मिळालेला विजय हा अविश्वसनीय असा होता.
दक्षिण ऑस्ट्रेलिया संघ अंतिम सामन्यात विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी ६ चेंडूवर फक्त ४ धावा हव्या होत्या. त्यांच्या हातात पाच विकेट होत्या. पण शेवटच्या ओव्हरमध्ये असा काही चमत्कार घडला की, एकामागोमाग पाचही विकेट पडत गेल्या. या चमत्कारीक ओव्हरमुळे क्रिकेट जगतामध्ये मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
तस्मानिया महिला संघाकडून शेवटची ओव्हर टाकण्याची जबाबदारी सारा कॉयटे (Sara Coyte) हीच्याकडे होती. साराने शेवटचे सहा चेंडूवर चमत्कारच केला. साराच्या या षटकात पाच विकेट तर पडल्याच पण पराभवाच्या जवळ पोहोचलेल्या तस्मानिया संघाला एका धावेने विजय देखील मिळाला.
असा होता शेवटच्या षटकातला रोमांच
दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या ४७ व्या षटकात साराच्या हातात चेंडू आला. पहिल्याच चेंडूवर साराने फलंदाजाला बोल्ड करत माघारी धाडले. दुसऱ्या चेंडवर नवीन आलेल्या फलंदाजाने एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर फलंदाजाला स्टपिंग करत बाद करण्यात आले. चौथ्या चेंडूवर नवीन आलेली फलंदाज रन आऊट झाली. तर पाचव्या चेंडूवर आणखी एक फलंदाज एलबीडब्लूने बाद झाली. अखेर शेवटच्या चेंडूवर देखील दुसरी धाव काढत असताना फलंदाजाला रनआऊट केले गेले. यापद्धतीने केवळ दोन धावा देऊन पाच फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम सारा कॉयटेने केला.
पाहा शेवटचे अविश्वसनीय षटक:
सामन्याच्या एकूण धावफलकावर नजर टाकली असता तस्मानियाने पहिल्या इनिंगमध्ये २६४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र पाऊस झाल्यामुळे काही ओव्हर्स आणि धावा कमी करण्यात आल्या. त्यामुळे दक्षिण ऑस्ट्रेलियासमोर ४७ ओव्हर्समध्ये २४३ धावा करण्याचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र दक्षिण ऑस्ट्रेलिया २४२ धावांवरच सर्व बाद झाली. अतिशय चमत्कारीक पद्धतीने तस्मानियाला एका धावेने विजय मिळाला.