आयपीएलचा उत्तरार्ध स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी यामुळे गाजला. त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याशी निगडित असलेले ‘चेन्नई-नाटय़’ क्रिकेटजगताने अनुभवले. मग भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंग्लिश भूमीवर पाऊल ठेवताच ‘ऱ्हिती स्पोर्ट्स’चे प्रकरण उजेडात आले. भारतीय क्रिकेट एक महाकठीण अशा संक्रमण काळातून जात असल्याची अनुभूती सर्वानी घेतली. पण आता हे सारे मागे सारून मैदानावरील क्रिकेटची अस्सल झुंज सर्वाचे लक्ष वेधणार आहे. जागतिक क्रिकेटमधील आठ दिग्गज संघांमधील प्रतिष्ठेची लढाई असे स्वरूप प्राप्त झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हटल्या जाणाऱ्या भारताच्या गटात दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे. भारताची गुरुवारी सलामी दक्षिण आफ्रिकेशी रंगणार आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सराव सामन्यांत अनुक्रमे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया साधल्यामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे. १५ महिन्यांनंतर भारतीय संघ प्रथमच भारतीय उपखंडाबाहेर एकदिवसीय मालिका खेळत आहे. परंतु एकदिवसीय क्रिकेटमधील जगज्जेतेपद भारताकडे असल्यामुळे या महत्त्वाच्या स्पध्रेत त्यांना त्याच रुबाबात उतरावे लागणार आहे.
सुदैवाने चॅम्पियन्स करंडक स्पध्रेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची कामगिरी चांगली आहे. भारताने आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले आहेत. नैरोबी जिमखाना मैदानावर १३ ऑक्टोबर २०००मध्ये भारताने ९५ धावांनी सामना जिंकला होता, तर कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर २५ सप्टेंबर २००२ला झालेला सामना भारताने १० धावांनी जिंकला होता.
ब-गटातून चारपैकी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचत असल्यामुळे प्रत्येक सामना रंगतदार होणार अशी क्रिकेटरसिकांची अपेक्षा आहे. पाकिस्तानशिवाय भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी किमान एकदा चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरण्याची किमया साधली आहे. ‘मिनी विश्वचषक’ अशी बिरूद मिरवणारी ही स्पर्धा १९९८मध्ये सुरू झाली होती. परंतु आता चॅम्पियन्स करंडक स्पध्रेच्या अखेरच्या पर्वाचे विजेते होण्यासाठी सर्वच संघ उत्सुक आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघसुद्धा मोठय़ा अपेक्षेने इंग्लंडमध्ये आला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हा संघ अग्रस्थानावर आहे. परंतु एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी गेले काही दिवस फारशी समाधानकारक नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यातसुद्धा याचा प्रत्यय आला होता. ओव्हलवरील तो सामना आफ्रिकेने सहा विकेट्सने गमावला होता. जॅक कॅलिस आणि ग्रॅमी स्मिथ हे दिग्गज खेळाडू त्यांच्यासोबत नसल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी निस्तेज भासत आहे.
आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेतून सहजपणे बाहेर निघत आता भारतीय खेळाडू ५० षटकांच्या क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. सध्या तरी इंग्लिश वातावरणाशी छानपणे जुळवून घेणाऱ्या दिनेश कार्तिकचे संघातील स्थान निश्चित दिसत आहे. दडपणाखाली खेळत कार्तिकने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांविरुद्ध शतके झळकावली. परंतु धोनी कार्तिकला सलामीच्या स्थानासाठी खेळवण्यास उत्सुक नाही. मात्र तो त्याला सहाव्या स्थानावर खेळवू शकेल. ‘‘मी कोणत्याही क्रमांकावर आनंदाने फलंदाजी करेन. मी कोणत्या स्थानावर योग्य आहे हे संघाने ठरवावे,’’ असे कार्तिकने सांगितले.
मुरली विजय आणि शिखर धवन ही भारताची कसोटीमधील सलामीची जोडी एकदिवसीय क्रिकेटमध्येही कायम राहील. या परिस्थितीत सराव सामन्यात अनुक्रमे ५ आणि १० धावा काढणाऱ्या रोहित शर्माचे चौथे स्थान डळमळीत दिसत आहे.
स्वालेक स्टेडियमवरील खेळपट्टी पाहता भारतीय संघ पाच विशेष गोलंदाजांसहित उतरेल. उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांनी इंग्लिश वातावरणाशी चांगले जुळवून घेतल्यामुळे भारतीय संघ आत्मविश्वासाने दक्षिण आफ्रिकेचा सामना करेल. भुवनेश्वर कुमार नवा चेंडू हाताळण्यात वाकबगार आहे. आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोन फिरकी गोलंदाज अंतिम चमूत निश्चितपणे असतील.
डेल स्टेनच्या तंदुरुस्तीबाबत दक्षिण आफ्रिकेचा संघ चिंताग्रस्त आहे. सराव सामन्यात त्याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते. कॅलिस आणि स्मिथच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेची मदार हशीम अमला, जे. पी. डय़ुमिनी आणि युवा, कणखर कप्तान ए बी डी’व्हिलियर्सवर असेल.
उभय संघ – भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), आर. अश्विन, शिखर धवन, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, इरफान पठाण, सुरेश रैना, ईशांत शर्मा, रोहित शर्मा, मुरली विजय, विनय कुमार, उमेश यादव.
दक्षिण आफ्रिका : ए बी डी’व्हिलियर्स (कर्णधार), हशीम अमला, फरहान बेहरदीन, जीन-पॉल डय़ुमिनी, फॅफ डय़ु प्लेसिस, कॉलिन इनग्राम, रयान मॅकलारेन, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, अल्विरो पीटरसन, रॉबिन पीटरसन, आरोन फांगिसो, डेल स्टेन, लोनवाबो त्सोत्सोबे.
सामन्याची वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट आणि स्टार स्पोर्ट्स-२.
वादविवादांवर धोनीचे मौन कायम
कार्डिफ : एकामागून एक वाद समोर येत असले तरी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने त्यावर आपले मौन कायम ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी धोनीने स्पॉट-फिक्सिंगबाबत काहीही बोलण्यास नकार देत योग्य वेळी उत्तर देणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ऱ्हिती स्पोर्ट्स या कंपनीमध्ये समभाग असल्याचे उघडकीस आल्यावर यावरही धोनीने काहीही न बोलता मौन धारण केले. या साऱ्या वादविवादांचा चॅम्पियन्स करंडकातील कामगिरीवर काही परिणाम होणार का, असे विचारल्यावर धोनी म्हणाला की, ‘‘या साऱ्या गोष्टींवर आम्ही विचार करीत नाही किंवा आतापर्यंत या घटनांमुळे मानसिकतेवर काही परिणाम झालेला नाही. आम्ही आव्हानासाठी सज्ज आहोत.’’ तो पुढे म्हणाला की, ‘‘पहिल्यांदाच आम्ही नवीन नियमावलीनुसार भारताबाहेर खेळत आहोत. ही नियमावली लवकर आत्मसात करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि संघातील खेळाडू या नियमाला कशा प्रकारे आत्मसात करतात, हे पाहायला हवे. ही नवीन नियमावली आत्मसात करण्यावर आमचा अधिक भर असेल.’’

दृष्टिक्षेप चॅम्पियन्स करंडक स्पध्रेवर
वर्ष                            विजेता            उपविजेता    यजमान
१९९८                दक्षिण आफ्रिका    वेस्ट इंडिज     बांगलादेश
२०००                न्यूझीलंड                  भारत         केनिया
२००२                भारत-श्रीलंका     (संयुक्तपणे)   श्रीलंका
२००४                वेस्ट इंडिज             इंग्लंड           इंग्लंड
२००६                ऑस्ट्रेलिया         वेस्ट इंडिज       भारत
२००९                ऑस्ट्रेलिया         न्यूझीलंड        दक्षिण आफ्रिका
२०१३    –    –        इंग्लंड   

Story img Loader